बुलावायो Wicketless Day in Test Cricket : 2024 हे वर्ष आता संपणार आहे आणि सरत्या वर्षाच्या शेवटी क्रिकेट विश्वात कसोटी क्रिकेटचा धुमाकूळ सुरु आहे. तीन बॉक्सिंग-डे कसोटी सामने एकाच वेळी खेळले जात आहेत. तिन्ही कसोटी सामने 26 डिसेंबरपासून सुरु झाले आणि आता तिन्ही कसोटी सामने रोमांचक वळणावर पोहोचले आहेत.
सर्व बॉक्सिंग-डे कसोटी रोमांचक वळणावर : मेलबर्न इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डीनं वॉशिंग्टन सुंदरसोबत 127 धावांची शानदार भागीदारी केली आणि त्यानंतर कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावून अनेक विक्रम केले. या शतकामुळं भारताला तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 358/9 धावा करता आल्या. मेलबर्नशिवाय सेंच्युरियनमध्येही दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा बॉक्सिंग-डे कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 121 धावांची गरज असून त्यांच्या 7 विकेट शिल्लक आहेत.
अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी : मेलबर्न आणि सेंच्युरियन व्यतिरिक्त तिसरी बॉक्सिंग-डे कसोटी झिम्बाब्वेच्या भूमीवर खेळली जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरु आहे. पहिल्या 2 दिवसात फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 3 फलंदाजांच्या शतकांच्या मदतीनं कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेनं पहिल्या डावात 586 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननंही रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या शानदार खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 425 धावा केल्या.