मुंबई IPL 2025 Mega Auction Vennue : IPL 2025 च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. अशा परिस्थितीत या लीगमध्ये सहभागी होणारे चाहते आणि खेळाडू त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. यासाठी BCCI नं नुकतेच रिटेनशन नियमही जाहीर केले. मात्र, मेगा लिलाव कधी आणि कुठं होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे, ज्यात मेगा लिलावाचं ठिकाण आणि तारीख कळली आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाची राजधानी रियाध हे या कार्यक्रमासाठी सर्वात पसंतीचं ठिकाण मानले जात असून BCCI लवकरच याला मान्यता देऊ शकते.
रियाध आणि जेद्दाह शहर आघाडीवर : मेगा लिलावासाठी BCCI सौदी अरेबियातील रियाध आणि जेद्दाह या दोन शहरांची पाहणी करत आहे. यामध्ये रियाधचं नाव आघाडीवर असून काही दिवसांत BCCI त्याला मान्यता देऊ शकते, अशी शक्यता आहे. वृत्तानुसार, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दोन्ही शहरांना भेट दिली आहे. तसंच हे अधिकारी पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतर स्थळ निश्चित केलं जाईल. क्रिकबझच्या अहवालानुसार, IPL 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होऊ शकतो. मात्र, BCCI नं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.