रावळपिंडी Semi Final Qualification Scenario : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता सुरु होणार होता, परंतु रावळपिंडीमध्ये मुसळधार पावसामुळं सामना झालेला नाही, नाणेफेकही झालेली नाही.
सामना रद्द झाल्यानं काय होईल: डकवर्थ लुईस नियमांनुसार निकाल लागण्यासाठी, दोन्ही संघांमध्ये किमान 25-25 षटकांचा खेळ पूर्ण होणं आवश्यक आहे. जर सामन्यात एकही षटक कमी असेल तर सामना रद्द केला जाईल, या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. रावळपिंडीमध्ये पाऊस पडत असल्यानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रद्द झाला आहे. आता यामुळं कोणत्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत होईल आणि कोणत्या संघाचा सामना खराब होईल. यासोबतच, ग्रुप बी मधील उर्वरित दोन संघ, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यासह हा सामना रद्द झाल्याचा फायदा कोणाला मिळेल, जाणून घेऊया.
कोणाला होईल फायदा : जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना पावसामुळं रद्द झाला तर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांचे 3-3 गुण होतील, परंतु धावगतीच्या बाबतीत, दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर असेल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असेल. हा सामना रद्द झाल्यानंतर, इतर दोन संघांसाठी (इंग्लंड आणि अफगाणिस्तान) उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता पूर्णपणे खुली होईल. हा सामना रद्द झाल्यानंतर, पुढील सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होईल. जो संघ तो सामना जिंकेल त्याला तिसरा आणि शेवटचा साखळी सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल. जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा निकाल लागला तर आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियामधील एक संघ जवळजवळ उपांत्य फेरीत पोहोचेल.
ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचं समीकरण कसं : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाला शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा साखळी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. या परिस्थितीत, त्यांचे 5 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीत पोहोचेल. जर ते अफगाणिस्तानकडून हरले तर ते 3 गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.
दक्षिण आफ्रिकेचं उपांत्य फेरी गाठण्याचं समीकरण :जर दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचायचं असेल, तर त्यांना इंग्लंडविरुद्धचा शेवटचा लीग सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. या परिस्थितीत, त्यांना 5 गुण मिळतील आणि आफ्रिकन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. जर या अंतिम सामन्यात इंग्लंडनं आफ्रिकेला हरवलं तर संघाला उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याचा धोका असू शकतो.
इंग्लंड आणि अफगाणिस्तानलाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी : इंग्लंड आणि अफगाणिस्ताननं प्रत्येकी एक सामना खेळला आहे. या दोन्ही संघांना पॉइंट टेबलमध्ये खातंही उघडता आलेलं नाही. आता या दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित दोन शेवटचे साखळी सामने जिंकावे लागतील, त्याचबरोबर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोघांनीही त्यांचे शेवटचे सामने गमावावेत अशी प्रार्थना करावी लागेल. पण हे समीकरण फक्त एकाच संघासाठी शक्य होईल, मग ते इंग्लंड असो किंवा अफगाणिस्तान. कारण हे दोन्ही संघ एकमेकांसोबत त्यांचा दुसरा लीग सामना खेळणार आहेत. तो सामना फक्त एकच संघ जिंकेल, जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत जाण्याची संधी असेल, तर पराभूत संघ त्याच दिवशी उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 26 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या होणार आहे.
हेही वाचा :
- 0,0,0 ते 56,118,55... कीवी फलंदाजानं वनडे क्रिकेटमध्ये केला अद्भुत विक्रम
- 'करो या मरो' सामन्यापूर्वी साहेबांचा मोठा डाव; AFG vs ENG मॅचच्याआधी 20 वर्षीय खेळाडूला संघात स्थान