मेलबर्न WTC Final Equation For India : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना पाच दिवस चालला होता, मात्र अखेर भारतीय क्रिकेट पराभवाला सामोरं जावं लागलं. मोहम्मद सिराजच्या रुपानं भारताची शेवटची विकेट पडली तेव्हा जवळपास 13 षटकांचा खेळ शिल्लक होता. भारतीय संघ सामना अनिर्णित करण्याचा विचार करत होता, मात्र ते शक्य झालं नाही. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली असताना, भारताचं मोठं नुकसान झालं आहे. तथापि, यानंतरही, ऑस्ट्रेलियन संघानं अद्याप WTC फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं नाही किंवा भारतीय संघ अद्याप बाहेर पडलेला नाही. पण समीकरणं नक्कीच बिघडली आहेत.
WTC फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ : जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोललो तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एका दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करुन WTC च्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं होतं. दक्षिण आफ्रिकेचं पीसीटी सध्या 66.89 आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पीसीटी 58.89 होता, तो आता 61.46 झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियानं मोठी झेप घेतली आहे. यानंतरही संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकला नसला तरी अंतिम फेरी गाठण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसत आहे.