सेंट किट्स WIW vs BANW 1st ODI Live Streaming :वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 19 जानेवारी (रविवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं खेळवला जाईल. आयसीसी चॅम्पियनशिप सामन्याअंतर्गत हा सामना सातव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिज आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ आतापर्यंत फक्त एकदाच वनडे सामन्यात आमनेसामने आले आहेत, ज्यात वेस्ट इंडिजनं विजय मिळवला आहे.
मागील वर्षभरात कामगिरी कशी :बांगलादेश या सामन्यात आत्मविश्वासानं प्रवेश करेल कारण 2024 मध्ये त्यांची कामगिरी वेस्ट इंडिजपेक्षा चांगली होती. कॅरिबियन संघानं या वर्षात नऊ वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त तीन सामने जिंकता आले आहेत, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय महिला संघाविरुद्धच्या मालिकेतील अलिकडेच झालेल्या दारुण पराभवाचा समावेश आहे. दुसरीकडे, बांगलादेशनं सहा वनडे सामने खेळले आहेत आणि तीन जिंकले आहेत, ज्यामुळं त्यांना विजयाची टक्केवारी 50 टक्के आहे, जी यजमानांच्या 33.33 टक्क्यांपेक्षा खूप चांगली आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वेस्ट इंडिज महिला आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांमध्ये आतापर्यंत फक्त 1 महिला वनडे सामना खेळला गेला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघानं विजय मिळवला आहे. हा सामना 2022 च्या महिला विश्वचषकादरम्यान खेळला गेला आहे. या दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत एकही द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. या दोन्ही संघामध्ये ही पहिलीच मालिका आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघात पहिला वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना आज 19 जानेवारी (रविवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं रात्री 11:30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल. याची नाणेफेक रात्री 11:00 वाजता होईल.