मुंबई: आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन अशी ओळख असलेली 'टाटा मॅरेथॉन स्पर्धा' (Tata Mumbai Marathon) आज मुंबईत पार पडली. 2004 पासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला आता वीस वर्षे झाली आहेत. या स्पर्धेत आशिया खंडातील अनेक देशांचे स्पर्धक सहभागी होतात. यावर्षी 63 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती मॅरेथॉनच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा होते. मागील काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुल मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं आहे. यावर्षी मात्र, इथोप्याच्या खेळाडूंचं वर्चस्व मोडीत काढत इरिट्रियाच्या खेळाडूंनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
राज्यपालांनी दाखवला मॅरेथॉनला हिरवा कंदील : आंतरराष्ट्रीय पूर्ण मॅरेथॉन ही सकाळी साडेसात वाजता सुरू झाली. यात विविध देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 42 किलोमीटर धावण्याची होती. हे 42 किलोमीटरचं अंतर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी 2 तास 11 मिनिट आणि 44 सेकंद या वेळेत धावून पूर्ण केलं आहे. सकाळी साडेसात वाजता राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर सर्व खेळाडूंनी दोन तासात ही 42 किलोमीटरची शर्यत पार केली.
कोणी पटकावला पहिला क्रमांक : सकाळी साडेसात वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झालेल्या या 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष गटात इरिट्रियाच्या बर्हान टेस्फायेने पहिला क्रमांक पटकावला आहे. बर्हान टेस्फायेने हे 42 किलोमीटरचे अंतर 2 तास 11 मिनिटे आणि 44 सेकंदात पार करत आपल्या विजयाची नोंद केली आहे. तर, याच देशाच्या मेरहावी केसेते या धावपटूने 2 तास 11 मिनिट 50 सेकंद या वेळेत शर्यत पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी इथोपियाला मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. यावर्षी इथोपियाच्या टेस्फये डेमेके या धावपटूंनी 42 किलोमीटरच्या अंतर दोन तास 11 मिनिट 56 सेकंदात पार केल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
भारतीय पुरुष गटात कोण विजयी : याच 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात अनिश थापा याने दोन तास 17 मिनिटे 23 सेकंद या वेळेत 42 किलोमीटरच्या अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मान सिंग यांनी दोन तास 17 मिनिट 37 सेकंद या वेळेत शर्यत पार करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतीय पुरुष गटात गोपी थोनाकल यांनी तिसरा क्रमांक पटकावला असून त्यांनी दोन तास 19 मिनिट 59 सेकंदात ही स्पर्धा पार केली आहे.
हेही वाचा -