अँटिग्वा (वेस्ट इंडिज) WI Beat ENG by 8 Wickets : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिका सुरु झाली आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजनं 8 विकेटनं सहज जिंकला आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ अवघ्या 209 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस स्टर्न नियमाचा वापर करुन 35 षटकांत 157 धावांचं लक्ष्य मिळालं. परिणामी यजमानांनी 9 षटकं शिल्लक असताना सामना जिंकला. यासह वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
एविन लुईसची वादळी खेळी : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात स्फोटक शतक झळकावणाऱ्या एविन लुईसनं या सामन्यातही वादळी खेळी केली. सुरुवातीला तो सावध खेळत होता पण नंतर त्यानं आक्रमक खेळायला सुरुवात केली. लुईसचं अर्धशतक 46 चेंडूत पूर्ण झालं. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 81 धावा होती. लुईस 48 चेंडूत 51 धावा करुन खेळत होता. पावसानंतर खेळ पुन्हा सुरु झाला तेव्हा लुईसनं आक्रमक फलंदाजी केली. पुढच्या 21 चेंडूत 43 धावा करत त्यानं वेस्ट इंडिजचा विजय जवळपास निश्चित केला. त्याचं शतक मात्र हुकलं. लुईसनं 69 चेंडूंत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 94 धावा केल्या.