मुंबई - इंडिया गॉट लेटेंट शोच्या कार्यक्रमात केलेल्या अश्लील वक्तव्यांप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं युट्यूबर रणवीर अलाहाबादीया याला २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं आहे. तसेच समय रैना याची ऑनलाईन जबाब नोंदविण्याची विनंती फेटाळून त्याला १८ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अश्लील विनोदाप्रकरणी आसाम पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीसांनी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली होती. अभिनेता रघु राम व स्टॅडअप कॉमेडियन देवेश दीक्षित यांच्यासह ३ जणांचे जबाब सायबर सेलने नोंदवले आहेत. तर, ७ जणांचे जबाब खार पोलिसांनी नोंदवले आहेत. वादग्रस्त भाग हा खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चित्रित झाला होता. पहिला समन्स रणवीर अलाबाहादीया, समय रैना व ३० इतर जणांना याप्रकरणी समन्स बजावण्यात आला होता. आता त्यांना दुसरा समन्स बजावण्यत आला आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सायबर विभागामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समय रैना हा स्टॅडअप कॉमेडीच्या वर्ल्ड टुरसाठी परदेशात आहे. दुसऱ्यांदा अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर सायबर विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
समय रैनाची मागणी सायबर विभागाने फेटाळली - समय रैना यालाही १८ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. परदेशात असल्यामुळे समय रैना यानं व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जबाब नोंदविण्याची विनंती केली होती. आपण १७ मार्चपर्यंत भारतात परत येऊ शकणार, असं सांगितलं होते. मात्र, त्याची ही मागणी सायबर विभागानं फेटाळली. त्याला स्वत: हजर राहून जबाब नोंदवावा लागेल, असं सायबर विभागनं स्पष्ट केलंय. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानं समय रैना आणि जसप्रीत सिंग यांची विनंती मान्य करुन ११ मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगासमोरही अनुपस्थित - रणवीर अलाहाबादीया यानं राष्ट्रीय महिला आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसही हजर होण्यास टाळलंय. आपल्याला ठार मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं कारण त्यानं यासाठी दिलंय. तसंच परदेशात असलेल्या युट्यूबर समय रैना हादेखील सुनावणीस अनुपस्थित राहीला. याप्रकरणी ६ मार्च रोजी आयोगासमोर सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोच्या एका भागात अश्लील वक्तव्यं केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादीया, समय रैना, अपूर्वा माखीजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथ्रा आणि बलराज घई यांना राष्ट्रीय महिला आयोगानं सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
हेही वाचा -