नवी दिल्ली Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. याचाच अर्थ तो पहिले दोन सामने खेळणार नाही. बीसीसीआयनं सोमवारी ही माहिती दिली.
वैयक्तिक कारणांमुळे माघार : "विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली. विराटनं कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे", असं बीसीसीआयनं निवेदनात सांगितलं. "बीसीसीआय विराटच्या निर्णयाचा आदर करतं. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आता उर्वरित संघाकडून कसोटी मालिकेत कौतुकास्पद कामगिरी करण्याचा पूर्ण विश्वास आहे", असं बोर्डानं निवेदनात म्हटलं. विराटच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल.
रोहित शर्माकडे नेतृत्व : भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे.