नंदुरबार : ताप्ती गंगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीत बसण्याच्या वादातून राजस्थानच्या दोन प्रवाश्यांवर अज्ञातानं धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल (दि.2) रेल्वे स्थानकावर घडली होती. भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन चढलेल्या एका प्रवाश्यासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर अज्ञातानं फोनवरुन आपल्या काही साथीदारांना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर बोलवून राजस्थानाच्या दोन प्रवाश्यांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. हल्ल्यातील जखमी प्रवाशांवर नंदुरबार शासकीय रूग्णलयात उपचार सुरू होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नामदार जयकुमार रावल यांनी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करून संशयितांना त्वरित ताब्यात घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. घटनास्थळी लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर यांनी भेट देऊन प्रकरणाबाबत माहिती घेतली आहे.
चाकू हल्ल्यातील जखमीचा मृत्यू : चेन्नईहून जोधपूरकडं जाणाऱ्या ताप्तीगंगा चेन्नई-जोधपूर एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून थेट धारदार शस्त्रांनं हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती. यात सुमेरसिंग जब्बर सिंह (२६) यांचा उपचारादरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर, परबत डुंगरसिंग परिहार (वय ४०) हा जखमी झाले आहेत. दोघेही राजस्थानकडं जनरल बोगीतून प्रवास करत असतांना भुसावळ स्टेशनहून रेल्वेत चढलेल्या एका प्रवाश्यासोबत बसण्याच्या जागेवरुन त्यांचा वाद झाला. यावेळी या प्रवाश्यानं वादातून आपल्या काही मित्रांना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर बोलावून घेतल.
संशयितांना त्वरित ताब्यात घेण्याच्या सुचना : ताप्तीगंगा एक्सप्रेस ४ वाजून २५ मिनिटाच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्यानंतर अज्ञातानं आपल्या मित्रांच्या मदतीनं राजस्थानच्या दोन्ही प्रवाश्यांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. यानंतर सुमेरसिंग जब्बरसिंग यांना मांडीवर तर, परवत परिहार यांना हातावर गंभीर जखम झाली. या वादानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमीवर प्राथमिक उपचार केला. तोपर्यत हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. यानंतर या दोघांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेतून जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल करण्यात आलं. सुमेरसिंह यांच्या पायावर गंभीर वार झाल्यानं अति रक्तस्त्राव झाल्यामुळं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची घटना त्याच्या जोधपूर येथील नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथील त्यांच्या समाजाच्या नागरिकांना याबाबत माहिती दिली. यानंतर समाज बांधव मोठ्या संख्येनं जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर समाज बांधवांनी राज्य शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांची भेट घेत त्यांना घटनेची माहिती दिली. यावर ना. जयकुमार रावल यांनी रेल्वे लोहमार्ग पोलीसांची चांगलीच कान उघडणे केली. घटनेची योग्य ती चौकशी करून संशयितांना त्वरित ताब्यात घ्यावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
लोहमार्ग पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट :
लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची देखील त्यांनी भेट घेतली. यावेळी लोहमार्ग पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यकांत बांगर उपस्थित होते. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून नाकाबंदी :
या घटनेच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार पोलीसांनी देखील नाकबंदी करत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाश्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयित ताब्यात घेण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या वतीने संशयीतांचा कसून तपास घेतला जात आहे.
हेही वाचा :