पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत शहरात या आजाराचे १६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ५ संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सोमवारी ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
आजार वाढीबाबत संशोधन : "गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या जीबीएस आजाराची कारणे काय? याबाबत आत्ता पशूसंवर्धन विभागाच्या वतीनं फक्त पाणी नव्हे तर, विविध पक्षी,पोल्ट्रीफॉर्म आणि मातीचे सँपल घेऊन याबाबत संशोधन करण्यात येत आहे," अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली.
२१ रुग्ण व्हेंटिलेटरवर : याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार म्हणाले की, "9 जानेवारीपासून पुणे तसेच आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण हे आढळून आले आहेत. आतापर्यंत शहरात या आजाराचे १६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ५ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात महापालिका भागातील ३२ रुग्ण, तर नव्यानं समाविष्ट झालेल्या भागातील ८६, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १८, पुणे ग्रामीण भागातील १९ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण १६३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १११ रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहेत. तर, ४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांचा डिस्चार्ज झाला आहे. जे १११ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत, त्यापैकी ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत."
पुण्यातील वाढत्या आकडेवारीबाबत अहवाल प्राप्त होणार : "पुणे महापालिका, राज्य शासन, तसेच केंद्र शासनाच्या आणि विविध पथकांच्या माध्यमातून पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले आहेत. यासह पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देखील खडकवासला विभागातील पोल्ट्रीफॉर्म, माती आणि पक्ष्यांच्या घश्यातील सँपल तसेच त्यांच्या विष्ट्यातील सँपल घेऊन या आजराबाबत संशोधन करून नेमकं त्या परिसरात का रुग्ण वाढत आहेत? याबाबत माहिती घेतली जात आहे. लवकरच याबाबत अहवाल देखील प्राप्त होणार आहे. यातून पु्ण्यातील रुग्णांच्या वाढीचं नेमकं काय कारण? हे देखील स्पष्ट होणार आहे." असं डॉ. राधाकिसन पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा :