बेंगळुरु Virat Kohli 9000 Runs in Test :विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा काहीतरी ना काही विक्रम नक्कीच घडतं जे चाहत्यांची मनं जिंकतं. यावेळी कोहलीनं बेंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आणि यासोबतच त्यानं कसोटीत 9000 धावाही पूर्ण केल्या. विराट कोहलीनं 197 कसोटी डावांमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीच्या 9000 कसोटी धावा खास आहेत, पण या खेळाडूचं बंगळुरु कसोटीतलं अर्धशतकही खास आहे. कारण भारतीय संघ बेंगळुरुमध्ये संकटात सापडली आहे आणि याच क्षणी विराटनं अर्धशतक झळकावलं.
विराट दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील :कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम यापूर्वी केला आहे. मात्र, या महान खेळाडूंमध्ये विराट कोहलीनं सर्वाधिक डाव खेळून 9 हजारांचा आकडा गाठला आहे. द्रविडनं 176 डावांमध्ये 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. सचिननं 179 डावात ही कामगिरी केली होती. 9000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी गावस्करनं 192 डाव आणि विराटला 197 डाव लागले.