नागपूर VID vs KER Final Day 1 Live : आजपासून नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए मैदानावर रणजी करंडकाचा फायनल (अंतिम) सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे केरळचा संघ पहिल्यांदाच रणजीच्या फायनलमध्ये पोहचला आहे तर तिसऱ्यांदा रणजी करंडकवर नाव कोरण्याच्या उद्देशानं विदर्भाचा संघ मैदानात उतरला आहे. त्यातच हा सामना नागपूरला होत आहे, त्यामुळं विदर्भाला पुन्हा ‘होमग्राऊंड’वर खेळण्याचा नक्की फायदा मिळणार असला तरी, केरळ संघातही अनुभवी व युवा खेळाडूंचा भरणा असल्यामुळं त्यांनाही विजेतेपदाची तितकीच संधी राहणार आहे. परिमाणी हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
विदर्भाची खराब सुरुवात :अंतिम सामन्यात केरळच्या संघानं नाणेफेक जिंकत विदर्भाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण जिल्यावर विदर्भाची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर पार्थ रेखाडे शुन्यावर आउट झाला. तसंच यानंतरच्या दोन विकेटही लवकर गेल्या, परिणामी विदर्भाची अवस्था 3 बाद 24 धावा झाली होती. यानंतर दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी मोठी भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चोथ्या विकेटसाठी द्वीशतकी भागीदारी केली आहे. तसंच यादरम्यान दानिश मालेवारनं शानदार शतक झळाकवलं. परिणामी सामन्याच्या पहिल्या दिवशी विदर्भाच्या फलंदाजांचं वर्चस्व राहिलं असून त्यांच्या दिवसअखेर 86 षटकात 4 बाद 254 धावा केल्या. सध्या दानिश मालेवार (138) आणि यश ठाकूर (5) नाबाद खेळत आहेत. आता दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्यावर विदर्भाची नजर असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
केरळ : अक्षय चंद्रन, रोहन कुन्नुमल, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), सलमान निजार, अहमद इम्रान, एडन अॅपलटन, आदित्य सरवते, एमडी निधीश, नेदुमकुझी बेसिल
विदर्भ : ध्रुव शोरे, पार्थ रेखाडे, दानिश मालेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश ठाकूर, दर्शन नालकांडे, अक्षय कर्णेवार.
विदर्भचा संघ सरस : विदर्भाच्या खेळाडूंचं या हंगामातील प्रदर्शन निश्चितच सरस राहिलं आहे. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करुन संघाला चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचविण्यात उल्लेखनीय योगदान दिलं आहे. फलंदाजीत यश राठोडनं पाच शतकांसह सर्वाधिक 933 धावा काढल्या असून, अनुभवी करुण नायर (642 धावा), कर्णधार अक्षय वाडकर (674 धावा), दानिश मालेवार (558 धावा) व ध्रुव शोरेनंही (446 धावा) विजयात मोलाची भूमिका वठविली आहे. तर गोलंदाजीत फिरकीपटू हर्ष दुबेनं अष्टपैलू प्रदर्शन करताना सर्वाधिक 66 बळी आणि 460 धावा काढल्या आहेत. याशिवाय आदित्य ठाकरे (28 बळी) व अनुभवी ऑफस्पिनर अक्षय वखरेसह (27 बळी) युवा नचिकेत भुते, यश ठाकूर व पार्थ रेखाडेनंही वेळोवेळी बळी टिपून प्रतिस्पर्धी संघाची सातत्यानं परीक्षा घेतली आहे.
केरळ संघातही अनुभवी खेळाडू : कारकिर्दीतील शंभरावा प्रथमश्रेणी सामना खेळणाऱ्या कर्णधार सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या केरळ संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा समावेश आहे. विशेषतः सलमान नाझीर (607 धावा), सलामीवीर महंमद अझरुद्दीन (601 धावा), रोहन कुन्नूमल (429 धावा) व स्वतः कर्णधार सचिन बेबी (418 धावा) आणि गोलंदाजीत अनुभवी व संघाचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना (38 बळी व 338 धावा) आणि वैदर्भीय आदित्य सरवटे (30 बळी ) या दोन फॉर्ममध्ये असलेल्या फिरकीपटूंकडून केरळला अधिक अपेक्षा राहणार आहे. केरळनं हंगामात चांगला खेळ करुन इथपर्यंत मजल मारली असली तरी, त्यांना नशिबाचीही थोडीफार साथ लाभली आहे. कागदावर दोन्ही संघ मजबूत असल्यानं ही लढत निश्चितच संघर्षपूर्ण होणार आहे.
हेही वाचा :
- VID vs MUM 2nd Semifinal: विदर्भानं घेतला 'बदला'; 42 वेळा रणजी विजेत्या मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक
- EXCLUSIVE: "मुंबईविरुद्धचा विजय बदला नाही, पण..."; सामन्यानंतर काय म्हणाला विदर्भाचा गोलंदाज हर्ष दुबे?