कॅलिफोर्निया Los Angeles Palisades Wildfire : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील जंगलातील आगीमुळं अमेरिकन जलतरणपटू गॅरी हॉल ज्युनियरचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीत गॅरी हॉल ज्युनियरची एक दोन नव्हे तर 10 ऑलिंपिक पदकं जळून खाक झाली. गॅरी हॉल ज्युनियर हा इतिहासातील महान जलतरणपटूंपैकी एक आहे. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस इथं लागलेल्या वणव्यात गॅरी हॉल ज्युनियरची 10 ऑलिंपिक पदकं आणि 6 जागतिक अजिंक्यपद पदकं जळून खाक झाली आहेत.
काय म्हणाला गॅरी हॉल :गॅरी हॉल ज्युनियरनं सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितलं की, "सर्वांना जाणून घ्यायचं आहे की पदकं जळाली का? हो, सगळं जळून खाक झालं होतं. हे असं काहीतरी आहे ज्याशिवाय मी जगू शकतो. मला वाटतं सगळं काही फक्त वस्तू आहेत. त्या पुन्हा मिळवण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील." तसंच तो म्हणाला की आता मी राख चाळून पाहेन आणि पदकं वितळली आहेत का ते पाहील. मला बचत करण्यासारखं काही सापडेल का? ही आग तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही भयपट चित्रपटापेक्षा 1000 पटीनं भयानक होती.
सर्व काही सोडून बायकोसोबत घराबाहेर पडला : गॅरी हॉल ज्युनियर पुढं म्हणाला की, "मी आगीच्या ज्वाला उठताना, घरं पडताना आणि स्फोट होताना पाहिलं. मी लगेच सगळं सोडून माझ्या बायकोसोबत घराबाहेर पडलो." लॉस एंजेलिसमधील आग पॅसिफिक पॅलिसेड्स, पासाडेना, अल्ताडेना आणि हॉलीवूड हिल्स भागात वेगानं पसरली आहे. खरं तर, सांता आना वादळानं आग वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, ज्यामुळं आगीनं सुमारे 108 चौरस किलोमीटर जमीन नष्ट केली आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसंच, एक लाखाहून अधिक लोकांनी आपली घरं रिकामी केली आहेत.
अनेक पदकं जिंकली : आपल्या शानदार कारकिर्दीत, हॉलनं 2000 (सिडनी) आणि 2004 (अथेन्स) ऑलिंपिकमध्ये सलग सुवर्णपदकं जिंकली होती. 1996 (अटलांटा) गेम्समध्ये त्यानं रिले इव्हेंटमध्ये 3 सुवर्णपदकं आणि ऑलिंपिक गेम्समध्ये 3 रौप्य आणि 2 कांस्यपदकं जिंकली आहेत.
हेही वाचा :
- अॅशेसमध्ये कांगारुंचं 'डॉमिनन्स' कायम, पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्या पाहुण्यांचा पराभव
- 20 वर्षांच्या वनवासाचा अंत, वीरुनं केली सर्व शस्त्रे सोडून देणाऱ्या अर्जुनासारखी वेशभूषा