नवी दिल्ली Uruguayan Defender Passes Away : 27 वर्षीय उरुग्वेचा फुटबॉलपटू जुआन इझक्वेर्डो याचं बुधवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात फुटबॉल खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं जुआन मैदानावरच पडला होता. त्यानंतर त्याच्या उपचार सुरु होते. आता त्याच्या क्लब नॅशनलनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती : नॅशनलनं सोशल मीडियावर लिहिलं, "क्लब नॅशनलला त्याचा प्रिय खेळाडू जुआन इझक्विएर्डोच्या मृत्यूची घोषणा करताना खूप दुःख झालं आहे आणि धक्का बसला आहे." आम्ही त्यांचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या कधीही भरुन न येणाऱ्या हानीमुळं नॅशनलचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे." याशिवाय साओ पाउलोनं 'फुटबॉलसाठी दु:खद दिवस' असं संबोधलं आहे. उरुग्वेच्या बचावपटूला गेल्या गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यानंतर अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयानं एका निवेदनात म्हटलं की त्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्यानं त्रास होत आहे. यानंतर 27 वर्षीय खेळाडू रविवारपासून व्हेंटिलेटरवर होता आणि सोमवारपासून न्यूरोलॉजिकल क्रिटिकल केअरमध्ये होता.