मुंबई Team India Open Bus Prade : विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ 4 जुलैला मायदेशी परतत आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता भारतीय संघ दिल्लीत पोहोचेल. दिल्लीत पोहोचल्यानंतर भारतीय संघ 11 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर भारतीय संघ मुंबईला रवाना होईल. मुंबईत भारतीय संघासाठी विजय परेडचंही आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली.
जय शाह आणि रोहितचं आवाहन : बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिलं, 'वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाच्या परेडमध्ये सामील व्हा. आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजता मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर पोहोचा, तारीख लक्षात ठेवा.' रोहित शर्मानंही या विजय परेडबाबत भावनिक आवाहन केलं. रोहितनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'आम्ही तुम्हा सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग 4 जुलै रोजी सायंकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे येथे विजय परेड करुन हा विजय साजरा करुया.'
कोणत्या मार्गावर होणार परेड : स्थानिक प्रशासन आणि क्रिकेट अधिकाऱ्यांकडून अंतिम आराखडा तयार केला जात आहे. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम, जिथं बीसीसीआयचे मुख्यालय देखील आहे, अशा मार्गावर खुल्या बसमध्ये संघानं विजयी परेड करणं अपेक्षित आहे. तसंच या विजयी परेड संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांची भेट घेतली. तसंच या विजयी परेडमुळं मुंबईच्या अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.
17 वर्षांपूर्वी झाला होता असाच कार्यक्रम : 17 वर्षांपूर्वी देखील असाच एक रोड शो आयोजित करण्यात आला होता. जेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पहिल्याच टी 20 विश्वचषक अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करुन जिंकला होता. यानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं शनिवारी (29 जून) 2024 च्या टी 20 विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन विजेतेपदावर कब्जा केला.
भारतीय संघाचा 4 जुलैचा कार्यक्रम :
- गुरुवारी सकाळी 6 वाजता विमान भारतीय संघाला घेऊन येणारं विशेष विमान उतरेल.
- सकाळी 9.30 च्या सुमारास ते पीएम हाऊससाठी रवाना होतील.
- पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ते चार्टर्ड फ्लाइटनं मुंबईला येतील.
- वानखेडे आणि मरीन ड्राईव्हवर खुल्या बसमध्ये विजयी परेड होणार.
- वानखेडेवर एक छोटेखानी सादरीकरण होणार असून रोहितकडून विश्वचषक बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
भारतानं चौथ्यांदा जिंकला विश्वचषक :भारतीय क्रिकेट संघानं टी 20 विश्वचषक 2024 मध्ये इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. याआधी भारतीय संघानं 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. तसंच 1983 आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषकही जिंकला आहे.
मुंबईत वाहतुकीत बदल : दरम्यान या विजय रॅलीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रॅली दरम्यान लोकलचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. रॅली निमित्त NCPA ते मेघदूत पुलापर्यंत मरीन ड्राईव्हच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच चर्चगेट स्थानकापासून सुंदरमहल जंक्शन पर्यंत आणि वीर नरिमन रोडची उत्तर वहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दिनशॉ वच्छा मार्ग WIAA चौक ते रतनलाल बुबना चौक (मरीन प्लाझा जंक्शन) ची उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मादाम कामा रोड मंत्रालय जंक्शन ते एअर इंडिया बिल्डिंग पर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग फ्री प्रेस जर्नल जंक्शन ते एन एस रोड पर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद असेल. विनय के शहा मार्ग जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी बंद असून कोस्टल रोडच्या दोन्ही वाहिन्या राहणार सुरु आहेत. मात्र कोस्टल रोडची वाहतूक प्रिन्सेस स्ट्रीट वरुन वळवण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग कोणते ? याचप्रमाणे एन एस रोड, वीर नरिमन रोड, मादाम कामा रोड, फ्री प्रेस जर्नल मार्ग, दिनशॉ वाच्छा मार्ग, महर्षी कर्वे रोड, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, रामनाथ गोयंका मार्ग, विनय के शहा मार्ग आणि जमनालाल बजाज मार्ग हे नो पार्किंग झोन ठेवण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून केम्स कॉर्नर ब्रिज इथून डावं वळण घेऊन नाना चौक इथून पुढे इच्छित स्थळी जाता येईल आरटीआय जंक्शन येथून डावं वळण घेऊन एन एस पाटकर मार्ग, पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) डावं वळण, एस. व्ही.पी रोड, तसंच पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) इथं उजवं वळण घेवुन महर्षी कर्वे मार्गानं पुढं इच्छित स्थळी जातील. विनोली चौपाटी डावं वळण, ऑपेरा हाऊस उजवं वळण, महर्षी कर्वे मार्गे पुढं इच्छित स्थळी जातील. मेघदूत ब्रिज (प्रिसेंस स्ट्रि ब्रीज) श्यामलदास जंक्शन-वर्धमान जंक्शन- मेट्रो जंक्शन पुढं इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा :
- 'कमबॅक' करावा तर असा...! आयपीएलमध्ये हुटींगचा बळी ठरलेल्या पांड्यानं रचला इतिहास; 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - ICC Rankings
- विश्वविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव; खेळाडू होणार मालामाल, बीसीसीआयनं केली मोठी घोषणा - Prize Money For Team India