Gautam Gambhir Press Conference :भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होत आहे. श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच पत्रकार परिषद आहे. यावेळी दोघांनी भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
हार्दिकचा पत्ता कट सूर्यकुमार नवा कर्णधार कसा :मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, "सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आलं, कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. आम्हाला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा आहे. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे प्रशिक्षकांसाठी कठीण होऊन बसतं. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यकुमार यादवमध्ये आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.
अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि संजू सॅमसन या खेळाडूंना संघातून वगळण्यात आल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, "त्यांना वगळण्यात आलं असं नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे पण संघात मर्यादित जागा असल्यामुळं आम्ही फक्त 15 जणांचा समावेश करू शकतो. रिंकूची कामगिरी चांगली होती. पण त्याला 2024च्या टी-20 विश्वचषकात संधी मिळाली नाही."