ढाका Best Bowling Figures in T20 : सध्या बांगलादेश प्रीमियर लीगचा (2024-25) 8वा सीझन बांगलादेशमध्ये खेळला जात आहे, याच्या अगदी 5 व्या सामन्यात T20 क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठा विक्रम होताना दिसला. चालू हंगामातील 5 वा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दरबार राजशाही विरुद्ध ढाका कॅपिटल्स संघादरम्यान झाला, ज्यात दरबार राजशाही संघाचा भाग असलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज तस्किन अहमदनं 19 धावांत 7 बळी घेतले. मात्र, या सामन्यात तस्किनच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतरही ढाका कॅपिटल्स संघानं 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावांपर्यंत मजल मारली.
तस्किननं केला विक्रम :T20 क्रिकेटच्या इतिहासातील एका सामन्यात सर्वात चमकदार गोलंदाजी करण्याचा विक्रम मलेशियाच्या शायाझरुल इद्रासच्या नावावर आहे, ज्यानं 2023 मध्ये क्वालालंपूर इथं चीनविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केवळ 8 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कॉलिन आर्चमनचं नाव आहे, त्यानं 2019 मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना यॉर्कशायरविरुद्ध 18 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या. आता या यादीत तस्किन अहमदचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आलं आहे, तस्कीननं 19 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आहेत. यासह तस्किननं बांगलादेश प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही केला.
तस्किननं बीपीएलमधील मोहम्मद आमिरचा विक्रम मोडला : तस्किन अहमदच्या आधी बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मोहम्मद अमीरच्या नावावर होता, ज्यानं 2020 साली खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात केवळ 17 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या, तर आता तस्किनच्या नावावर आहे. हा विक्रम मोडत बीपीएलच्या या मोसमात नवा इतिहास रचला आहे. तस्किनबद्दल बोलायचं झाले तर, त्यानं बांगलादेश संघासाठी आतापर्यंत 73 T20 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 23.29 च्या सरासरीनं 82 विकेट घेतल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 16 धावांत 4 विकेट्स घेणे हा त्याचा सर्वात शानदार गोलंदाजी स्पेल आहे.
तस्किनच्या संघानं जिंकला सामना : ढाका कॅपिटल्सनं तस्किन अहमदचा संघ दरबार राजशाहीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. तस्किनच्या घातक गोलंदाजीनंतरही त्यांनी 20 षटकांत 174 धावा केल्या. मात्र, दरबार राजेशाहीसाठी या धावा फारच कमी ठरल्या. त्यांनी केवळ 3 गडी गमावून 11 चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला आणि मोसमातील पहिला विजय नोंदवला. 7 संघांच्या या स्पर्धेत ते आता 2 सामन्यांत एक विजय मिळवून गुणतालिकेत 4 व्या स्थानावर पोहोचले आहे.
हेही वाचा :
- ऑल इज नॉट वेल... प्लेइंग 11 मधूनच नव्हे तर भारतीय संघातूनही रोहित बाहेर
- कॅरेबियन गोलंदाजानं एका चेंडूत दिल्या 15 धावा, ओव्हरमध्ये टाकले 12 बॉल; पाहा व्हिडिओ