न्युयॉर्क T20 World Cup IND vs PAK :टी20 विश्वचषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणाला. अ गटात झालेला हा सामना न्यूयॉर्कमध्ये रंगला. पण याआधी न्यूयॉर्कमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळं नाणेफेकीला उशीर झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र सामना सुरु झाल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपला जलवा दाखवत भारतीय फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. अवघ्या 100 धावात भारताचे सात फलंदाज तंबूत परतले. भारताकडून ऋषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज नसीम शाहनं 3 तर मोहम्मद आमीरनं 2 बळी घेत भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानंतर मात्र भारतीय संघानं जोरदार खेळाचं प्रदर्शन करत सामना जिंकला.
पाकिस्तानची नाचक्की :या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी या विश्वचषकात पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नव्या संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडं भारतानं पहिला सामना जिंकलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं नुकताच आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात भारताचा हा पहिलाच सामना होता, जो त्यांनी 46 चेंडू शिल्लक असताना जिंकला. आता कर्णधार रोहित हाच सामना जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही मैदानात उतरु शकतो. दुसरीकडं, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या प्लेइंग 11 मध्ये इमाद वसीमला स्थान देऊ शकतो. तर आझम खान याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा अमेरिकेकडून पराभव झाला होता. इमाद दुखापतीमुळं त्या सामन्यात खेळू शकला नव्हता.