Rohit Sharma Statement :आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतानं कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी मात करत उपांत्य फेरीत पाचव्यांदा प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीत कांगारुंना विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारताच्या गोलंदाजांसमोर कांगारुंना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता सुपर-8 मधील शेवटचा सामना हा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. अफगाणिस्तानला विजय मिळवून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे.
सामना जिंकल्यानंतररोहित शर्मा काय म्हणाला? : ''आमच्यासाठी काहीही बदलणार नाही. आम्ही एक टीम म्हणून काय करू शकतो, यावरच आमचं लक्ष केंद्रीत आहे.” तसंच रोहितला बाद फेरीमध्ये खेळण्याच्या दृष्टीकोणाबाबत विचारलं असता त्यावर रोहितनं म्हटलं की, "आम्ही वैयक्तिक खेळण्याऐवजी टीमच्या फायद्याच्या हिशोबानं खेळत आहोत. पुढंही असंच खेळणार. आम्ही अशाच प्रकारे खेळू इच्छितो. परिस्थितीनुसार काय करायचं हे आम्ही समजतो. खेळाडूंनी कोणत्याही दबावाखाली न खेळता बिनधास्तपणे खेळावं. आम्ही आतापर्यंत सर्व सामन्यात तसंच करत आलो आहोत. उपांत्य फेरीतही तसंच करण्याचा प्रयत्न करु हे आमच्यासाठी चांगलं राहिल'', असं रोहित शर्मा म्हणाला.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ सात गडी गमावून केवळ 181 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडनं 76 धावांची खेळी केली पण त्याची मेहनत व्यर्थ गेली. भारतीय संघाच्या या विजयामागं 5 खेळाडूंची दमदार कामगिरी आहे. पाहुयात कोण आहेत हे खेळाडू.
'हे' 5 खेळाडू ठरले भारताच्या विजयाचे शिल्पकार…
- रोहित शर्मा:टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. रोहितनं खेळलेल्या खेळीनं ऑस्ट्रेलियन संघाचं मनोधैर्य खच्ची झालं. रोहितनं 41 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीनं 92 धावा केल्या. या सामन्यात रोहितनं आक्रमक फलंदाजी केली. मिचेल स्टार्कनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात त्यानं 29 धावा केल्या.
- अक्षर पटेल :या सामन्यात अक्षर पटेलनं तीन षटकात 21 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानं मार्कस स्टॉइनिसला बाद केलं. पण अक्षर हा त्याच्या गोलंदाजीमुळं नाही तर त्याच्या क्षेत्ररक्षणामुळं सामन्याचा हिरो ठरला आहे. अक्षरनं नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला.
- जसप्रीत बुमराह :ट्रॅव्हिस हेडनं एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात शतक झळकावलं होतं. त्याच्या खेळीमुळं भारताचं विश्वविजेते होण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यातही हेड भारतावर वर्चस्व गाजवत होता. पण जसप्रीत बुमराहनं 17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेडला झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं.
- अर्शदीप सिंग : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपनं 4 षटकांत 37 धावा देत 3 विकेट घेतले. त्यानं पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. याशिवाय अर्शदीपनं टीम डेव्हिड आणि मॅथ्यू वेडची विकेट घेतली.
- कुलदीप यादव : कुलदीप यादवनं पुन्हा एकदा आपल्या फिरकी गोलंदाजीनं फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग खुला केला. कुलदीपनं 4 षटकांत 24 धावा देत दोन बळी घेतले. मिचेल मार्शशिवाय त्यानं ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली.