T20 World Cup 2024 :टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सध्या सुपर-8 फेरीचे सामने खेळले जात आहेत. सुपर-8 फेरीतील दुसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सामन्यात टीम इंडिया बांगलादेश संघाशी भिडणार आहे. सुपर-8 फेरीतील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियानं सुपर-8 मधील पहिला सामना जिंकल्यानं आणखी एका विजयासह रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचेल. मात्र दुसऱ्या बाजुला सुपर-8 मधील पहिला सामना गमावल्यानं आता बांगलादेशसाठी 'करो या मरो' अशी स्थिती आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिली तर टीम इंडिया पूर्णपणे वरचढ आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात टीम इंडियानं 12 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेश संघाला आतापर्यंत फक्त 1 सामना जिंकता आला. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा भिडले. या काळात टीम इंडियानं सर्व सामने जिंकले आहेत. बांगलादेशनं टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला अद्याप पराभूत केलेलं नाही.
सुपर-8 मध्ये दोन्ही संघांची कामगिरी : सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. याआधी ग्रुप स्टेजमध्येही टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघानं आयर्लंडचा 8 गडी राखून, पाकिस्तानचा 6 धावांनी आणि अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केलाय. तर बांगलादेशला सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 गडी राखून, नेदरलँडचा 25 धावांनी तर नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. याशिवाय बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंवर असेलनजर:बांगलादेशविरुद्धच्या आजच्या महत्वाच्या सामन्यात धावा करण्याची जबाबदारी फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्यावर असेल. सूर्यकुमार यादवनं 4 सामन्यात 112 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात त्यानं 53 धावांची इनिंग खेळली. तर गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल.