नवी दिल्ली T20 World Cup 2024 Semi Fianl :वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाचे दोन्ही उपांत्य सामने 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 आणि रात्री 8 वाजता खेळवले जातील. दोन्ही सेमीफायनलची क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत. भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकण्यापासून फक्त 2 विजय दूर आहे. एक पाऊल पुढं टाकण्यासाठी उपांत्य फेरीत त्यांचा सामना माजी विजेता इंग्लंडशी होणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळं ते आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीसाठीही पात्र ठरतील, अशी आशा चाहत्यांना आहे.
4 तास 10 मिनिटं मिळणार अतिरिक्त वेळ :भारत-इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघाकडे फक्त 7 तास 20 मिनिटे आहेत. टी 20 क्रिकेटच्या दोन्ही डावांसाठी लागणारा वेळ अंदाजे 3 तास 10 मिनिटं आहे. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीत पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाऊस सतत पडत राहिल्यास आणि थांबला नाही, तर सामन्याच्या वेळेव्यतिरिक्त 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. अशा परिस्थितीत जर पाऊस थांबला नाही आणि सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. मात्र, जर पाऊस मध्यंतरी थांबला, तर षटकं कमी करुन सामना सुरु करता येईल.