गकबेर्हा SEC vs MICT SA20 1st Match Live :दक्षिण आफ्रिकेची T20 लीग SA20 आजपासून म्हणजेच 9 जानेवारीपासून सुरु होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल.
दोन्ही संघात काटे की टक्कर :आजपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ पूर्ण तयारीत असल्याचं दिसत आहे. गत हंगामातील चॅम्पियन संघ सनरायझर्स इस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांना त्यांच्या पहिल्याच सामन्यातून पुन्हा गती मिळवायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळू शकते. या स्पर्धेत सनरायझर्स इस्टर्न केपची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. तर, एमआय केपटाऊनचं नेतृत्व राशिद खान करत आहे.
सहा संघ आपापसात भिडणार :या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. ही लीग 2023 मध्ये सुरु झाली होती आणि तेव्हापासून तिचे दोन हंगाम पूर्ण झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघानं विजेतेपद पटकावलं आहे. या मोसमात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे.
आयपीएलच्या धर्तीवर सुरु झाली लीग : आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी 20 लीग सुरु झाली. आयपीएलच्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील पहिला सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील स्पर्धेतील पहिला सामना आज गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज पार्क इथं खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.