मेलबर्न Steve Smith Record Century :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथनं फलंदाजीत उत्कृष्ट शतक झळकावलं. स्मिथचं कसोटी कारकिर्दीतील हे 34 वं शतक आहे, तर या मालिकेत स्मिथनं सलग दुसरं शतक झळकावण्यातही यश मिळवलं आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ 68 धावांवर नाबाद होता, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच त्यानं कर्णधार पॅट कमिन्ससोबत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि 167 चेंडूत शतक पूर्ण केलं. आपल्या शतकी खेळीच्या जोरावर स्मिथनं अनेक महान खेळाडूंचे विक्रमही मोडीत काढले, ज्यात त्यानं विशेष यादीत जो रुटलाही मागे टाकलं आहे.
स्मिथ भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू : स्टीव्ह स्मिथचं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 34 वं शतक आहे, तर स्मिथनं भारताविरुद्ध या फॉरमॅटमध्ये 11 वं शतक झळकावलं आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथनं जो रुटला मागे टाकलं असून तो आता भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे. रुटनं भारताविरुद्ध कसोटीत 10 शतकी खेळी खेळली आहे. स्मिथनं आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत केन विल्यमसनला मागे टाकले आहे, तर त्याने सुनील गावस्कर आणि ब्रायन लारा यांची बरोबरी केली आहे, या दोन्ही खेळाडूंनी 34-34 शतकं झळकावली आहेत.