नवी दिल्ली LLC Auction : क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणं ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी उपलब्धी असते. सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक होय. मात्र, असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी अवघ्या दोन चेंडूत तीन बळी घेत हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं कधीच घडले नाही. यात भारताच्या प्रवीण तांबे व्यतिरिक्त श्रीलंकेच्या इसुरु उडानाच्या नावावर हा अनोखा कारनामा आहे.
उडाणावर सर्वात जास्त बोली :लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सध्या खेळाडूंसाठी बोली लावली जात आहे. या लीगमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू खेळतात. सर्वात मोठी बोली श्रीलंकेच्या इसुरु उडानावर लावण्यात आली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज उडानाला अर्बनरायझर्स हैदराबादनं तब्बल 62 लाख रुपयांना विकत घेतलं. मात्र, शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंची नावं अद्याप लिलावात आलेली नाहीत.
2010 मध्ये उडानानं केला चमत्कार : श्रीलंकेच्या इसुरु उडानानं 2010 मध्ये दोन चेंडूत हॅट्ट्रिक विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाजही ठरला. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स लीगमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सचा सामना वायंबाशी होत होता. त्या सामन्यात उडानानं प्रथम ब्रॅड पिटनला बाद केलं. पुढचा चेंडू वाईड होता आणि त्यावर मॅथ्यू सिंक्लेअर यष्टीचीत झाला. अशाप्रकारे उडानानं एका लीगल चेंडूवर दोन बळी घेतले. पुढच्याच चेंडूवर जॉर्ज वॉकर बोल्ड झाला. अशाप्रकारे उडानानं आपली हॅटट्रिक पूर्ण करुन इतिहास रचला.
उडानाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : 36 वर्षीय इसुरु उडानानं 2009 मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केलं होतं. त्याला 2021 मध्ये शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली. 12 वर्षात त्याला 21 एकदिवसीय आणि 35 टी 20 मध्ये संधी मिळाली. यात उडानाच्या नावावर एकूण 45 विकेट्स आहेत. त्यानं फलंदाजी करत 493 धावांचं योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्याची सर्वात मोठी खेळी 84 धावांची होती. 31 जुलै 2021 रोजी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
हेही वाचा :
- IPL लिलावात रोहितसाठी 'या' संघानं 50 कोटी रुपये ठेवले? खुद्द मालकांनींच दिलं थेट उत्तर - Rohit Sharma
- एक-दोन नव्हे तर 13 वेळा डोक्याला लागला चेंडू; 26 वर्षाय खेळाडूला घ्यायला लावली सक्तीची निवृत्ती? - Will Pucovski