दांबुला SL vs NZ 1st ODI Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांमधील दोन सामन्यांची T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा वनडे मालिकेकडे लागल्या आहेत. श्रीलंकेनं नुकतंच घरच्या मैदानावर वनडे मालिकेत वेस्ट इंडिज आणि भारताचा पराभव केला. अशा स्थितीत न्यूझीलंडलाही कडवं आव्हान दिलं जाऊ शकतं.
या वनडे मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असालंकाच्या खांद्यावर असेल. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज कुसल परेरा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज यांचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे. तर न्यूझीलंडचं कर्णधारपद मिचेल सँटनरकडे असेल. यष्टिरक्षक फलंदाज मिच हे आणि अष्टपैलू नॅथन स्मिथ यांचा प्रथमच किवी संघात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या संघांनी आतापर्यंत एकूण 102 वेळा वनडे सामने खेळले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडनं 102 पैकी 52 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 41 सामने जिंकले आहेत. नोव्हेंबरमध्ये बेंगळुरु इथं ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साखळी सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा सामना झाला होता. ज्यात किवी संघानं श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला होता. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता न्यूझीलंड संघ अधिक मजबूत असल्याचं स्पष्ट होतं. मात्र ही मालिका श्रीलंकेत खेळवली जात असल्यानं श्रीलंकेला हरवणं किवी संघासाठी तितकं सोपं नसेल.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. कुमार संगकारानं न्यूझीलंडविरुद्धच्या 47 सामन्यांच्या 45 डावांमध्ये 40.20 च्या सरासरीनं 1568 धावा केल्या आहेत. या कालावधीत, कुमार संगकारानं 12 अर्धशतकं आणि 2 शतकं केली आहेत आणि नाबाद 113 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरननं न्यूझीलंडविरुद्धच्या 41 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 17.94 च्या सरासरीनं आणि 3.55 च्या इकॉनॉमीनं 74 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय या यादीत श्रीलंकेचा चामिंडा वास दुसऱ्या स्थानावर आहे. चामिंडा वासनं न्यूझीलंडविरुद्धच्या 35 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 22.22 च्या सरासरीनं आणि 3.84 च्या इकॉनॉमीनं 49 विकेट घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचा काइल डेव्हिड मिल्स ३२ विकेट्ससह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.