सेंच्युरियन SA vs PAK 1st Test Live Streaming :दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. यातील पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं खेळवला जाणार आहे.
WTC फायनलसाठी आफ्रिकेला एका विजयाची गरज : यजमान दक्षिण आफ्रिका 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्लीन स्वीप झाल्यानंतर या सामन्यात प्रवेश करेल. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये प्रोटीज संघानं अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत 2-0 असा शानदार विजय नोंदवला होता. या कामगिरीनं त्यांना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी नेलं, ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारताला मागे टाकलं. आता पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाला अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. WTC फायनल जून 2025 मध्ये लॉर्ड्सवर खेळवली जाईल.
विजयी लय कायम राखण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न :दुसरीकडे, पाकिस्ताननं पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर हीच लय कायम ठेवण्याच्या इराद्यानं कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच, पाकिस्ताननं तीन वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका जिंकली. पाकिस्तान आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
आफ्रिकेच्या भूमिवर पाकिस्तानची खराब कामगिरी : दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानचा विक्रम तितकासा प्रभावी ठरला नाही. त्यांनी आफ्रिकेत आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी सामना जिंकला होता. यजमान संघ WTC फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं करण्याच्या इराद्यानं या सामन्यात प्रवेश करेल, तर पाकिस्तान आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा आणि इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या 28 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 15, तर पाकिस्ताननं केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतं की, कसोटी प्रकारात दक्षिण आफ्रिकेचं पाकिस्तानवर वर्चस्व आहे. यासह देशांतर्गत परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेला आणखी मजबूत बनवतो.
खेळपट्टी कशी असेल :दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमधील खेळपट्टी साधारणपणे बाऊन्स आणि वेगवान गती देते. याशिवाय, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ट्रॅकला खूप सीम हालचाल आणि स्विंग मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दोन दिवसांत या मैदानावर वेगवान गोलंदाजांसाठी गोलंदाजी करणं खूप फायदेशीर ठरु शकतं. त्याच वेळी, जर सूर्य बाहेर आला तर खेळपट्टीतील ओलावा निघून जाईल आणि पुढील दोन दिवसात ती फलंदाजीसाठी चांगली होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?