सेंच्युरियन SA vs PAK T20I : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची सातत्यानं लाजिरवाणी कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यांना मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्यांचा 7 विकेट्सनं एकतर्फी पराभव झाला आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं फलंदाजीत चांगली कामगिरी करताना 20 षटकात 206 धावा केल्या, पण गोलंदाजीत संघाला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकांत तीन विकेट्स गमावत लक्ष्य गाठलं.
रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन डर ड्युसेन यांची उपयुक्त खेळी : या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 28 धावांवर रायन रिकेल्टन आणि मॅथ्यू ब्रेत्झके यांच्या विकेट्स गमावल्या. येथून, रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन डर डुसेन यांनी आफ्रिका संघाच्या डावाची जबाबदारी तर घेतलीच पण वेगानं धावा काढण्याची प्रक्रियाही सुरु केली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 157 धावांची मॅच-विनिंग पार्टनरशिप झाली, ज्यामुळं पाकिस्तानला मॅचमधून पूर्णपणे काढून टाकलं. दक्षिण आफ्रिकेसाठी, त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही चौथी सर्वात मोठी भागीदारी होती.
सर्वाधिक धावा काढणारा दुसरा खेळाडू : रीझा हेंड्रिक्सच्या बॅटमधून 63 चेंडूत 117 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. ज्यात त्यानं 7 चौकार आणि 10 षटकारही ठोकले. यासह रिझा आता आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू आहे. या सामन्यात व्हॅन डर डुसेननं 66 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेलं. याआधी हेंड्रिक्सनं T20 मध्ये केवळ 17 अर्धशतकं झळकावली होती. त्याला पहिलं T20I शतक करण्यासाठी 10 वर्षे लागली.