सेंच्युरियन Playing 11 for Boxing Day Test :बॉक्सिंग डे रोजी म्हणजेच 26 डिसेंबर रोजी, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळेल. आफ्रिकन संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपलं स्थान पूर्णपणे निश्चित करण्यासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे, ज्यामध्ये ते सध्या गुणतालिकेत पहिले स्थान व्यापले आहेत. दक्षिण आफ्रिकेला या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियनच्या मैदानावर खेळायचा आहे. आफ्रिकेनं या सामन्यासाठी आपला प्लेइंग 11 घोषित केली आहे, ज्यामध्ये 30 वर्षीय खेळाडूलाही कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे सामना सुरू होण्याच्या 48 तासाआधीच आपल्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे.
कॉर्बिन बॉशला सेंच्युरियनमध्ये पदार्पण करण्याची संधी :
दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियन मैदानावर खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यासाठी 30 वर्षीय अष्टपैलू कॉर्बिन बॉशचा समावेश केला आहे. कॉर्बिन हा माजी कसोटीपटू टर्टियस बॉश यांचा मुलगा आहे. कॉर्बिन गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रभावित करत आहे. आतापर्यंत 34 प्रथम श्रेणी सामने खेळताना, कॉर्बिनने 40.46 च्या सरासरीनं 1295 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 10 अर्धशतकांच्या खेळी देखील खेळल्या आहेत. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला निश्चितच काही प्रमुख वेगवान गोलंदाजांची उणीव भासणार आहे, ज्यात जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे, हे सर्व दुखापतींनी त्रस्त आहेत, ज्यामुळं त्यांची शक्यता कठीण झाली आहे.