सातारा : जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी 24 डिसेंबरला सायंकाळी भारतीय सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवानांना वीरमरण आलं. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र शुभम घाडगे यांचा समावेश आहे. शुभम घाडगे हे 11 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. या घटनेमुळं कामेरी गावावर शोककळा पसरली आहे.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर सैन्य दलात भरती : कामेरी गावचे सुपूत्र शुभम घाडगे यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं होतं. महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज अपशिंगे मिलिटरी इथं पूर्ण करून ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. कामेरी, अपशिंगे मिलिटरी या परिसरातील अनेक जवान भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहेत. शुभम घाडगे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच कामेरी परिसरावर शोककळा पसरली.
वीर जवानाच्या पार्थिवाची प्रतिक्षा : गावचे सुपूत्र शुभम घाडगे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आल्यानं कामेरी गाव सुन्न झालं आहे. शुभम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे. आता ग्रामस्थांना वीर जवानाच्या पार्थिवाची प्रतिक्षा आहे. लवकरच त्यांचं पार्थिव गावी दाखल होईल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
गंभीर जखमींपैकी पाच जणांना वीरमरण : एकूण 18 जवान प्रवास करत असलेलं सैन्य दलाचं वाहन मंगळवारी खोल दरीत कोसळलं. या दुर्घटनेत 11 मराठा रेजिमेंटचे 6 जवान गंभीर जखमी झाले. नियंत्रण रेषेकडं (एलओसी) जात असताना हा अपघात झाला. पाठीमागून आलेल्या सैन्य दलाच्या वाहनातील जवानांनी जखमींना जवळच्या सैन्य दलाच्या रुग्णालयात नेलं असता, जखमींपैकी पाच जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.
हेही वाचा :