नवी दिल्ली Shikhar Dhawan in Action : भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर शिखर धवनबाबतच्या चर्चा आता थांबल्या आहेत. अशातच ज्या देशाची लोकसंख्या 4 कोटीही नाही अशा देशाच्या संघासाठी त्याला क्रिकेट खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. आपण नेपाळबद्दल बोलत आहोत. 2023 च्या जनगणनेनुसार नेपाळची लोकसंख्या केवळ 3.09 कोटी आहे. पण, इथं क्रिकेटची क्रेझ भारतापेक्षा कमी नाही. नेपाळचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय संघही आहे. मात्र, शिखर धवन त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघासाठी नाही तर नेपाळ प्रीमियर लीग संघ कर्नाली याक्ससाठी खेळणार आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती : शिखर धवन नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळत असल्याची माहिती कर्णाली यॅक्स आणि या संघाचा आयकॉन बनलेली अभिनेत्री स्वस्तिमा खडका यांनी दिली. स्वस्तिमा खडकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धवनच्या जॉईन झाल्याची माहिती दिली. स्वस्तिमा खडकानं धवनच्या टीमसोबतच्या कराराची माहिती अतिशय फिल्मी शैलीत दिली. पोस्ट शेअर करताना तिनं शोले चित्रपटातील गब्बरचा डायलॉग त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिला, 'कितने आदमी थे.' भारताचा माजी डावखुरा सलामीवीर नेपाळ प्रीमियर लीगचा सर्वात मोठा चेहरा मानला जात आहे.