केपटाऊन Highest Opening Stand :दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊन इथं सुरु आहे. यात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 615 धावांचा डोंगर उभारला. यानंतर पाकिस्तानी संघ पहिल्या डावात केवळ 194 धावा करु शकला आणि त्यांना फॉलोऑन खेळावा लागला.
दुसऱ्या डावात विक्रमी फलंदाजी : पण दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज वेगळ्याच इराद्यानं फलंदाजीसाठी उतरले. शान मसूद आणि बाबर आझम अशी फलंदाजी करतील, याची कोणालाच अपेक्षा नव्हती. सलामी देताना दोन्ही फलंदाजांनी 205 धावांची विक्रमी भागीदारी केली. जी फॉलोऑन मिळाल्यावर सर्वाधिक सलामीची भागीदारी ठरली. या खेळाडूंच्या भागीदारीमुळंच पाकिस्तानी संघ संकटावर मात करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला आहे. पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 213 धावा केल्या असून अद्यापही ते 208 धावांनी पिछाडीवर आहे.
बाबर आझम आणि शान मसूद यांची विक्रमी भागीदारी :पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शान मसूद आणि बाबर आझम यांनी अप्रतिम फलंदाजी केली. दोन्ही खेळाडू पाकिस्तानी संघासाठी सलामीला आले आणि अगदी सुरुवातीपासूनच ते क्रीजवर स्थिरावले. शान आणि बाबरनं 205 धावांची भागीदारी करुन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांची भागीदारी करणारी ही पहिली पाकिस्तानी सलामी जोडी आहे. या दोघांपूर्वी पाकिस्तानची कोणतीही सलामी जोडी अशी कामगिरी करु शकली नव्हती. यापुर्वी आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी 1998 साली दक्षिण आफ्रिकेत सलामी करताना 101 धावांची भागीदारी केली होती. आता हा विक्रम खूप मागे राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानसाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी :
- बाबर आझम, शान मसूद - 205 धावा
- आमिर सोहेल, सईद अन्वर - 101 धावा
- सलीम इलाही, तौफिक उमर - 77 धावा
- इमाम उल हक, शान मसूद - 67 धावा