चेन्नई INDW vs SAW Only Test : काही तासांनी भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडं सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. मात्र त्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (28 जून) भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी विक्रमी भागिदारी केलीय. शेफाली आणि स्मृती मंधाना या भारतीय जोडीनं 292 धावांची सलामी दिली. महिलांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. शेफालीनं वैयक्तिक विक्रमही या सामन्यात नोंदवला आहे.
शेफालीनं रचला इतिहास :दक्षिण आफ्रिकेच्या डेल्मी टकरनं मंधानाला 149 धावांवर बाद करुन ही भागीजारी तोडली. मात्र यानंतर शेफालीनं ऐतिहासिक द्विशतक झळकावलं. शेफालीनं तिचं द्विशतक अवघ्या 194 चेंडूत पूर्ण केले. महिलांच्या कसोटी सामन्यात कोणत्याही फलंदाजाचं हे सर्वात जलद द्विशतक ठरलं. शेफालीनं 256 चेंडूत द्विशतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला मागं टाकलं. तसंच भारतीय महिलांच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारी शेफाली वर्मा ही केवळ दुसरी फलंदाज ठरली. शेफाली वर्मापूर्वी फक्त मिताली राजनंच हा विक्रम केला. मितालीनं 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टाँटन इथल्या कसोटी सामन्यात 214 धावांची इनिंग खेळली होती. शेफाली वर्मानं 197 चेंडूत 23 चौकार आणि 8 षटकारांसह 205 धावा केल्या.
भारतानं मोडला पाकिस्तानचा विक्रम : शेफाली आणि मंधानानं 2004 मध्ये कराचीमध्ये पाकिस्तानच्या साजिदा शाह आणि किरण बलोचच्या वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या 241 धावांच्या भागीदारीला मागं टाकलं. तसंच महिलांच्या कसोटी सामन्यातील कोणत्याही विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. 1987 मध्ये वेदरबीमध्ये इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी एलए रीलर आणि डीए ऍनेट्स या ऑस्ट्रेलियन जोडीमध्ये 309 धावांची भागीदारी झाली होती. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी 2021 मध्ये ब्रिस्टल इथं इंग्लंडविरुद्ध 167 धावांची त्यांची मागील सर्वोत्तम भागीदारीही मागं टाकली. यासह या दोघांनी कोणत्याही विकेटसाठी यापूर्वीची सर्वोच्च भारतीय भागीदारीही मागं टाकली. याआधी हा विक्रम पूनम राऊत आणि थिरुश कामिनी यांच्या नावावर होता, त्यांनी 2014 मध्ये म्हैसूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 275 धावांची भागीदारी केली होती.