हैदराबाद IPL 2024 SRH vs CSK : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईनं यजमान संघाला विजयासाठी 166 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे 11 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्जचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. गेल्या सामन्यातही त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडं, सनरायझर्स हैदराबादचा चार सामन्यांतील हा दुसरा विजय ठरलाय.
अभिषेक शर्माची आक्रमक सुरुवात : लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मानं हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मानं अवघ्या 12 चेंडूत 37 धावांचा तडाखा दिला, ज्यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. अभिषेकच्या खेळीनं हैदराबादला गती दिली. अभिषेक बाद झाल्यानंतर, एडन मार्करम आणि ट्रॅव्हिस हेड यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या, ज्यामुळं चेन्नईचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार एडन मार्करमनं 36 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 50 धावा केल्या. तर 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून आलेल्या हेडनं 24 चेंडूत 31 धावांची खेळी केली, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. चेन्नईकडून मोईन अलीनं सर्वाधिक दोन बळी घेतले. तर दीपक चहर आणि महेश तीक्षणा यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.