मेलबर्न Sam Konstas Records : ऑस्ट्रेलियाचा युवा सलामी फलंदाज सॅम कॉन्स्टासनं मेलबर्नच्या मैदानावर भारताविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात पदार्पण करुन खूप चांगली कामगिरी केली. ज्यामध्ये त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच डावात 60 धावा केल्या आणि अनेक नवीन विक्रमही केले. या सामन्यात पहिल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकलेल्या नॅथन मॅकस्विनीच्या जागी सॅम कॉन्स्टासचा ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. सॅमनं या संधीचा पुरेपूर फायदा घेत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 65 चेंडूत 60 धावा केल्या. सॅम कॉन्स्टास ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
बॉक्सिंग-डे कसोटीत पदार्पणात अर्धशतक झळकावणारा चौथा खेळाडू : ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीनं, सॅम कॉन्स्टासला बॉक्सिंग-डे कसोटीत थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली. कॉन्स्टासनं उत्कृष्ट अर्धशतक झळकावून हा सामना संस्मरणीय बनवला ज्यामध्ये तो सलामीवीर म्हणून पदार्पण करताना अर्धशतक झळकावणारा बॉक्सिंग-डे कसोटी इतिहासातील चौथा खेळाडू ठरला. कॉन्स्टासच्या आधी हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक, भारताचा मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियाचा एड कोवान यांनी केला होता. फ्रेडरिक्सनं 1968 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती, तर मयंक अग्रवालनं 2018 मध्ये 76 धावा आणि कोवाननं 2011 मध्ये 68 धावा केल्या होत्या. याशिवाय सॅम कॉन्स्टासनं आज 60 धावांची खेळी केली आहे.