मुंबई - बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणून ओळखला जाणारा सलमान खान गेल्या तीन दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवतो आहे. या तीन दशकात त्यानं अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यापैकी अनेक ब्लॉकबस्टर ठरले आहेत. सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की उद्या 27 डिसेंबरला सलमान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सिकंदर या चित्रपटातून सलमान खान त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. याआधी आपण सलमान खानच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
वॉन्टेड (2009)
वॉन्टेड या चित्रपटातून सलमान खाननं बॉलिवूडमध्ये धमाकेदार अॅक्शन दाखवली होती. या चित्रपटामुळं सलमान खानच्या करिअरला चालना दिली. या चित्रपटात त्यानं आयपीएस राजवीर शेखावत यांची भूमिका साकारली होती. प्रभूदेवा दिग्दर्शित या चित्रपटाचं बजेट 35 कोटी रुपये होते. या चित्रपटानं 90.21 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. सलमान खानच्या करिअरच्या हिटलिस्टमध्ये वॉन्टेडचा समावेश आहे.
दबंग फ्रेंचाइजी (2010)
वॉन्टेडच्या यशानंतर सलमान खाननं 2010 मध्ये 'दबंग' या अॅक्शन कॉमेडी चित्रपटानं धमाल उडवून दिली होती. या चित्रपटात सलमाननं पोलीस इन्स्पेक्टर 'चुलबुल पांडे'ची मजेशीर भूमिका साकारली. या भूमिकेनं प्रेक्षकांना हसवलं आणि अॅक्शननं आचंबित केलं. दबंग फ्रँचायझीचे तीनही भाग हिट आहेत. दबंगनं जगभरात 221.14 कोटी रुपये, दबंग 2 आणि 3 नं अनुक्रमे 253.54 कोटी रुपये आणि 230.93 कोटी रुपयांची कमाई केली होती.
टायगर फ्रँचायझी (२०१२)
दबंगनंतर सलमान खानला हिट चित्रपटाची इच्छा होती आणि 2012 मध्ये कबीर खाननं यशराजचा जासूस विश्व दाखवणारा एक था टायगर हा चित्रपट बनवला. एक था टायगर हा यशराज जासूस विश्वातील पहिला चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खाननं भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा दुसरा भाग आणि 'टायगर 3'ही हिट ठरले. गेल्या वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायगर 3 नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.
सुलतान (2016)
टायगरच्या यशानंतर चार वर्षांनंतर सलमान खान पहिल्यांदाच सुलतान चित्रपटात लाल लंगोट घातलेला कुस्तीपटू म्हणून दिसला. या चित्रपटात सलमान खान अनुष्का शर्माच्या प्रेमात पडला होता. सुलतान हा सलमान खानच्या करिअरमधील सर्वात फायदेशीर चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटानं जगभरात ६२३.३३ कोटींची कमाई केली होती.
पार्टनर (2007)
भारतीय कॉमेडी चित्रपटांच्या यादीत सलमान खानचाही पार्टनर आहे. यामध्ये त्याचा पार्टनर होता गोविंदा. दोघांच्या कॉमेडी टायमिंगनं लोकांना मनमुराद हसवलं. पार्टनर हा 28 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट होता, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 99.64 कोटींची कमाई केली होती.
सलमान खानचे इतर ब्लॉकबस्टर चित्रपट
'हम आपके है कौन', 'साजन', 'हम दिल दे चुके सनम' आणि 'तेरे नाम' नंतर सलमान खानच्या या पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांबरोबरच तुम्ही 'बजरंगी भाईजान' देखील पाहू शकता.