मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वजण दुःख व्यक्त करत असताना अभिनेता अनुपम खेरनंही त्यांना श्रद्धांजली वाहिली. मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा सिनेमाच्या पडद्यावर साकारताना त्यांच्याबद्दल भरपूर जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं अनुपम यांनी म्हटलंय. त्यांच्या अनेक आठवणी सांगताना त्यांचं दयाळू, प्रमाणिक, हुशार, सभ्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्व यामुळं प्रभावित झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या अनुपम खेर कामाच्या निमित्तानं देशाबाहेर आहेत. त्यांनी तिथून एक व्हिडिओ शेअर करुन डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
अनुपम खेर म्हणाले, "डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीनं अतिशय खोलवर दुःख झालं. मी देशाच्या बाहेर आहे. मी मनमेहन सिंग यांच्या जीवनबरोबर जवळपास दीड वर्ष घालवली आहेत. त्यांचा अभ्यास करताना, त्यांचं कॅरेक्टर समजून घेताना, त्यांचे मॅनरिझम शिकताना...जेव्हा एखादा कलाकार बायोपिक करतो तेव्हा त्या व्यक्तीचं फिजीकल अस्पेक्ट्स समजून घेतो, परंतु, ते कॅरेक्टर प्रमाणिकपणे जगण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीच्या आतमध्ये जाण्याची गरज असते. मनमोहन सिंग हे आंतर्बाह्य चांगले व्यक्ती होते. सभ्य, हुशार, तेजस्वी दयाळू आणि तुम्ही जर 'अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' आता पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, या सर्व क्वालिटी त्याच्यामध्ये दिसतील. मी जेव्हा हा चित्रपट ऑफर झाला होता तेव्हा मी तो वेगवेगळ्या कारणांनी नाकारला होता. राजकीय कारणही त्याच्यात होतं, मला वाटलं की मी ही भूमिका करेन आणि लोक म्हणतील की त्यांची चेष्ठा करण्याच्या हेतुनं मी हा सिनेमा केलाय. असं काही संशयीतांना म्हटलंही. परंतु, मला जर माझ्या आयुष्यातल्या तीन किंवा चार व्यक्तिरेखा सांगायच्या असतील तर 'अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर'मधील मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा एक आहे. मला वाटतं की मी ही भूमिका खूप प्रमाणिकपणे केली होती."
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना अनुपम खेर पुढं म्हणाले, "ते खूप सुंदर व्यक्ती होते. त्यांच्या जाण्यानं मला खूप खोलवर दुःख झालंय. मी त्यांच्या बरोबर एक दोन वेळा कार्यक्रमात वेळ घालवला आहे. ते माझ्याशी अतिशय दयाळू आणि उदारपणानं वागले होते. त्यांनी मी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक केलं होतं. त्यांचं सर्वात सुंदर वैशिष्ठ्य होतं ते, त्यांची ऐकण्याची शक्ती. त्यांच्या काळात काही वादग्रस्त गोष्टी घडल्या असतील पण ते इमानदार होते आणि त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं काम केलं होतं. मी वारंवार दयाळू या शब्दाचा वापर करतोय कारण, दयाळूपणा हा अतिशय दुर्मिळ असा गुण झालाय सध्याच्या काळात. खूप अवघड होतं त्यांची भूमिका करणं, बाकी सर्व क्वालिटीज, फिजीकल अस्पेक्ट्स तर जमत होते, परंतु मला त्यांचं कॅरिकेचर त्याहून वेगळं करायचं नव्हतं. जेव्हा हा चित्रपट बनला तेव्हा मी खूप आनंदी होतो कारण मी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला होता. विषय थोडा वादग्रस्त होता परंतु ते नव्हते. मी निळ्या पगडीधारी व्यक्तीला आज गमावलं आहे. देव त्यांना शांती देओ. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाचं, या देशाचं मोठं नुसकासन झालंय."