सेंच्युरियन Corbin Bosch World Record : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये बॉक्सिंग-डे टेस्ट 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशीच ती रोमांचक टप्प्यावर पोहोचली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात अवघ्या 211 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेसाठी, कॉर्बिन बॉशनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेतल्या, तर 35 वर्षीय डेन पीटरसननं 5 विकेट्स घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात काही खास झाली नाही, पण सलामीवीर एडन मार्कराम आणि त्यानंतर पदार्पण करणारा कॉर्बिन बॉश यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 301 धावा केल्या आणि 90 धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू : दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करामनं सर्वाधिक 89 धावांची खेळी खेळली. त्याच वेळी, गोलंदाजीत विक्रमी कामगिरी केल्यानंतर, कॉर्बिन बॉशनं फलंदाजीतही विक्रमी कामगिरी केली आणि 81 धावा केल्या. कॉर्बिननं 93 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीनं ही शानदार अर्धशतकी खेळी खेळली आणि अशा प्रकारे पदार्पणाच्या कसोटीत 4 विकेट्ससह अर्धशतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला.
एका वर्षात दुसऱ्यांदा मोडला जागतिक विक्रम :दक्षिण आफ्रिकेच्या 191 धावांवर 7 विकेट पडल्या असताना कॉर्बिन बॉश नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यानंतर बॉशनं मार्कराम, रबाडा आणि नंतर पीटरसनसोबत छोट्या भागीदारी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. बॉश 81 धावा करुन नाबाद परतला. अशाप्रकारे त्यानं पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी हा मोठा विक्रम श्रीलंकेच्या मिलन रत्नायकेच्या नावावर होता. मिलाननं याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावर 72 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर या लंकन खेळाडूनं बलविंदर सिंग संधूचा विक्रम मोडला होता आणि आता कॉर्बिन बॉशनं मिलन रत्नायकेचा विक्रम मोडीत काढत खळबळ उडवून दिली आहे.
पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज :
- 81* धावा - कॉर्बिन बॉश विरुद्ध पाकिस्तान, 2024
- 72 धावा - मिलन रत्नायके विरुद्ध इंग्लंड, 2024
- 71 धावा - बलविंदर सिंग संधू विरुद्ध पाकिस्तान, 1983
- 59 धावा - मोंडे जोंडेकी विरुद्ध इंग्लंड, 2003
- 56* धावा - विल्फ फर्ग्युसन विरुद्ध इंग्लंड, 1948
हेही वाचा :
- 'मैं झुकेगा नहीं...' डेब्यू मालिकेत नितीशनं कांगारुंना फोडला घाम; 'हा' कारनामा करणारा पहिला भारतीय
- स्टीव्ह 'सेंच्युरियन' स्मिथ... विराट, रुट, विल्यमसन, पाँटिंग सर्वांना मागे टाकत बनला 'नंबर वन'