दुबई Rohit Sharma All Time Record : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आणखी एक नवा विक्रम रचला आहे. आता रोहित शर्मा त्या क्लबचा भाग बनला आहे, ज्यात भारताकडून फक्त सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच आपलं स्थान निर्माण करु शकले होते. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मानं एक धाव घेताच, त्यानं वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नऊ हजार धावा पूर्ण केल्या.
रोहित शर्मानं वनडेत सलामीवीर म्हणून 9000 धावा केल्या पूर्ण : रोहित शर्मानं आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये 262 डाव खेळले आहेत. यात त्यानं 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पण जर आपण त्याच्याबद्दल सलामीवीर फलंदाज म्हणून बोललो तर त्यानं 181 डावांमध्ये 9 हजार धावा केल्या आहेत. या सामन्याआधी त्यानं 8999 धावा केल्या होत्या. म्हणजे त्याला या सामन्यात फक्त एक धाव हवी होती. जी त्यानं शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये साध्य केलं.
दोनच फलंदाजांनी केली कामगिरी :भारताकडून सलामीवीर म्हणून फक्त सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनीच रोहित शर्मापेक्षा जास्त वनडे धावा केल्या आहेत. आधी सचिनबद्दल बोलूया कारण तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 340 वनडे सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करताना 15310 धावा केल्या आहेत. जर आपण सौरव गांगुलीचा विचार केला तर त्यानं वनडे सामन्यांमध्ये 236 डावांमध्ये सलामीला फलंदाजी करताना 9146 धावा केल्या आहेत. आता रोहित शर्माचं लक्ष्य सौरव गांगुली असेल, त्याला मागे सोडण्यासाठी रोहितला येथून पुढं जास्त धावा काढण्याची गरज नाही.
तीनच फलंदाजांनी केल्या 10 हजारांपेक्षा जास्त धावा :वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून फक्त तीन फलंदाजांना 10000 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. यात सचिन तेंडुलकर निश्चितच पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याच्या नावावर 15 हजारांहून अधिक धावा आहेत. यानंतर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचं नाव येतं. त्यानं 383 वनडे सामन्यांमध्ये 12740 धावा केल्या आहेत. या यादीतील तिसरा फलंदाज ख्रिस गेल आहे. ज्याच्या 274 वनडे सामन्यांमध्ये 10179 धावा आहेत.
हेही वाचा :
- विराटचं 51वं शतक, यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर; टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
- अबब... 70000000 रुपयांचं घड्याळ घालून हार्दिक पांड्या PAK vs IND सामन्यात उतरला मैदानात
- विराट कोहली @14000... PAK vs IND सामन्यात दिग्गजांना मागे सोडत बनला जगातील अव्वल फलंदाज