सिडनी Fastest Fifty for India in Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनी इथं खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ 185 धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर ऑलआउट केलं. भारताला आता सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगलं लक्ष्य ठेवण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं शानदार खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे, पण तो एक मोठा विक्रम चुकला.
ऋषभ पंत मोठ्या विक्रमाला मुकला : ऋषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा भारतानं 78 धावांच्या स्कोअरवर 4 विकेट गमावल्या होत्या. येथून पंतनं स्फोटक खेळी करत भारतासाठी एक खास विक्रम केला. या सामन्यात ऋषभ पंतनं 33 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यानं अवघ्या 29 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून हे दुसरं सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी पंतनंच 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. जे भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक करुन तो स्वतःचाच विक्रम मोडू शकला असता, पण तो हुकला.