नागपूर Vidarbha Ranji Team : विदर्भ रणजी क्रिकेट संघामधील खेळाडू अनेक भविष्यत भारतीय क्रिकेट संघात किव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मवर(आयपीएल) खेळताना दिसलेत तर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये, त्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे विदर्भ रणजी संघाचे सर्वं खेळाडू विजय खेचून आणण्याचा निश्चय करुनचं जणू मैदानात उतरतात. पाच ते सात वर्षांपूर्वी कधी एकही रणजी ट्रॉफी न जिंकू शकणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघानं सलग दोन रणजी ट्रॉफीवर नावं कोरलं असून आता तिसऱ्यांदा विजयाची आस लागलेली आहे. मुळात विदर्भाच्या खेळाडूंना विजयाची सवय लागली कशी? त्यांच्यात विजय खेचून आणण्याची भावना कुणी पेरली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळात सातत्य कसं राखायचं? हा गुण कुणी शिकवला असेल तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे विदर्भ क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे एक नाव प्रामुख्यानं घ्यावंच लागेल. अर्थातचं यामागे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद जैस्वाल, वर्तमान अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती विनय देशपांडे भारतीय संघाचे माजी खेळाडू प्रशांत वैद्य तसंच निवड समितीतील सदस्यांचं देखील योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे.
सातत्यानं कामगिरी : गेल्या 6 वर्षात विदर्भ रणजी संघाची कामगिरी सातत्यानं उंचावत आहे, चंद्रकांत पंडित यांनी विदर्भ रणजी क्रिकेट संघाचा पाया जरी रचला असला तरी त्यावर कळस चढवण्याचं काम हे संघाचे वर्तमान प्रशिक्षक उस्मान गणी करताना दिसत आहेत. विदर्भाच्या खेळाडूंमध्ये प्रतिभा तर आहेचं, केवळ त्यांना गेम प्लॅनिंग व डावपेच शिकवण्याची गरज होती. कोच म्हणून चंद्रकांत पंडित नंतर मी देखील या मुलांना कोचिंग करत असताना त्यांच्यातील बलस्थान ओळखून त्याचं पद्धतीनं कोचिंग करण्यावर भर देत असल्याची प्रतिक्रीया विदर्भ रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक उस्मान गणी यांनी दिली आहे.
काय म्हणाले प्रशिक्षक : संघाबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले, "विदर्भाच्या खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. संघ ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेतुन जातोय जुने खेळाडूंच्या जागी नवे खेळाडू संघात येत आहेत तरी ही उत्साह व जोश किंचितही कमी झालेला नाही. आमचे खेळाडू प्रतिभावंत आहेत, त्यामुळं ते लवकर निळ्या जर्शीमध्ये दिसतील. गेल्या वेळी आम्ही मुंबईकडून पराभूत झाले असलो तरी ही यंदा आमच्या खेळाडूंचे हौसले बुलंद आहेत." तसंच यंदाचं विजेतेपद आम्ही जिंकणार असा ठाम विश्वास प्रशिक्षक उस्मान गणी यांनी व्यक्त केला आहे.

प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या काळात बहरला विदर्भचा संघ : सन 2017-18 आणि 2018-19 सलग दोनदा रणजी ट्रॉफी अजिंक्यपद विदर्भानं पटकावलेलं आहे. गेल्या सीजनमध्ये विदर्भचा फायनलमध्ये मुंबई संघानं पराभव केला होता. 2017-18 व 2018-19 याकाळात विदर्भ रणजी संघाची प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी संघाची मजबूत पायाभरणी केली. याच काळात चंद्रकांत पंडित आणि वसीम जाफर यांच्या जोडीनं विदर्भच्या संघाला विजयाची चव चाखायला शिकवलं. त्या अर्थानं चंद्रकांत पंडित व वसीम जाफर यांची अफलातून केमिस्ट्री ही संघासाठी लकी ठरली होती. तेव्हापासून विदर्भ रणजी क्रिकेट संघानं आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं असून त्याचं श्रेय चंद्रकांत पंडित आणि वसीम जाफर यांच्या जोडीला द्यावं लागेल.

विदर्भ रणजी क्रिकेटचा इतिहास आणि वर्तमान : विदर्भ क्रिकेट संघाचं पूर्वीचं नाव मध्य प्रांत असं होतं. तर विदर्भ म्हणून त्यांनी 1957-58 च्या हंगामात पहिला सामना खेळला. मात्र त्यांना पहिल्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी 2017-18 च्या हंगामाची वाट पाहावी लागली. यानंतर मात्र संघानं मागे वळून पाहिलं नाही. संघानं सन 2017-18 आणि 2018-19 असं सलग दोन वेळा रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. तसंच मागील हंगामातही संघानं अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु मुंबईनं त्यांच्या पराभव केला. यंदा मात्र विदर्भानं सेमीफायनलमध्ये मुंबईचा पराभव करत मागील पराभवाचा बदलाही घेतला असून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्यांच्या सामना केरळशी होणार आहे.
