जेद्दाह Rishabh Pant Most Expensive Player in IPL History : आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरु आहे. सुरुवातीला 12 मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यावेळी मार्की खेळाडूंच्या यादीत सात भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहेत, त्यांनी गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
पंतनं रचला इतिहास : सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो.
अय्यरला टाकलं मागे : यासह पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे. यात, त्यानं श्रेयस अय्यरला मागं सोडलं आहे, जो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. ऋषभ पंतसाठी लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगलं होतं. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढं गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाला, पण लखनऊनंही हार मानली नाही.