मुंबई Tribute to Ratan Tata : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळं देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रीडा जगतातील अनेक खेळाडूंनी याबद्दल शोक व्यक्त केला. भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, हरभजन सिंग, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
सचिननं दिला आठवणींना उजाळा : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रतन टाटा यांच्याबद्दलचं प्रेम प्रकट केलं. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं की, 'रतन टाटा यांनी केवळ त्यांच्या आयुष्यातच नव्हे तर त्यांच्या मृत्यूमध्येही देशाला हादरा दिला. मी त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. पण जे लाखो लोक त्यांना कधीच भेटले नाहीत ते देखील माझ्यासारखेच सध्या त्रस्त आहेत. हा त्यांचा प्रभाव आहे. प्राण्यांवरील त्यांच्या प्रेमापासून ते त्यांच्या परोपकारापर्यंत टाटा यांनी दाखवून दिलं की, खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण त्यांची काळजी घेऊ जे स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. टाटा, तुम्ही उभारलेल्या संस्था, तुमचा वारसा कायम आहे.'
रोहित शर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'एक असा माणूस ज्याच्याकडे सोन्याचं हृदय होतं. सर, तुमची खऱ्या अर्थानं इतरांची काळजी घेणारे आणि इतरांच्या भल्यासाठी आयुष्य जगणारे माणूस म्हणून तुम्ही नेहमी लक्षात रहाल.'
सुर्यकुमार यादव : भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'भारतानं एक खरा प्रतीक गमावला आहे. रतन टाटा सरांचं दूरदर्शी नेतृत्व, करुणा आणि परोपकाराची अटल वचनबद्धता आपल्या देशावर आणि जगावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचा वारसा आपल्या सर्वांना शांततेनं प्रेरणा देतो.'