मुंबई Ranji Trophy 2023-24 : रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम फेरीत विदर्भ संघानं धडक मारलीय. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात यश राठोडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यानं विदर्भासाठी शानदार फलंदाजी करताना शतक झळकावलं. आता अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. 10 मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाणार आहे. यानिमित्तानं रणजीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रातीलच दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
पहिल्या डावात विदर्भाची खराब सुरुवात :अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यानंतर संघानं चांगली कामगिरी करुन सामन्यात दमदार पुनरागमन केलं. विदर्भानं पहिल्या डावात सर्वबाद 170 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून सलामीवीर अथर्वनं 39 धावांचं योगदान दिलं होतं. तर करुण नायरनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 105 चेंडूत 63 धावा केल्या. तर कर्णधार अक्षय अवघ्या 1 धावा करुन बाद झाला. त्यांच्या संघाचे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. मध्य प्रदेशसाठी आवेश खाननं भेद गोलंदाजी केली. त्यानं 15 षटकांत 49 धावा देत 4 बळी घेतले. तर कुलवंत आणि व्यंकटेश अय्यरनं 2-2 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. विदर्भाच्या 170 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशनं पहिल्या डावात 252 धावा केल्या. त्यांच्याकडून हिमांशू मंत्रीनं शतक झळकावलं. त्यानं 265 चेंडूत 126 धावा केल्या. मात्र त्याचं शतक संघाला विजय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडलं नाही. विदर्भाकडून उमेश यादवनं 3 तर यश ठाकूरनंही 3 बळी घेतले.