ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) IND vs BAN 1st T20I Gwalior : ग्वाल्हेर इथं 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी, जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश 7 ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील. हिंदू महासभेनं 6 ऑक्टोबरला दिलेली ग्वाल्हेर बंदची हाक आणि इतर संघटनांनी केलेला विरोध पाहता प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
हिंदू महासभेचा विरोध : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू महासभेनं हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशमध्ये ऑगस्टमध्ये हिंसाचार, राजकीय गोंधळ आणि सरकार बदलल्यानंतर ही संघटना निषेध करत आहे. बुधवारी संघटनेनं ग्वाल्हेरमध्ये या संदर्भात निदर्शनं करत सामना रद्द करण्याचीही मागणी केली.
कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश : ग्वाल्हेरचे जिल्हा दंडाधिकारी रुचिका चौहान यांनी पोलीस अधीक्षक (SP) यांच्या शिफारशीवरुन भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ब्रिटिशकालीन फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) बदलून हे कलम अलीकडं लागू करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक म्हणाले की, विविध संघटना आंदोलनं, मिरवणुका, पुतळे जाळणे यासारख्या कामांमध्ये गुंतलेल्या असतात, त्यामुळं जिल्ह्यातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.