मुंबई Prithvi Shaw Dropped :बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉला मोठा धक्का बसला आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला मुंबई संघातून वगळण्यात आलं आहे. 24 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याच्या वाढत्या वजनामुळं निवडकर्त्यांनी मुंबई संघात निवडलं नसल्याचं सांगितलं जात आहे.
शरीरातील चरबी वाढल्यामुळं बाहेर :सध्याच्या रणजी मोसमात मुंबईला 26 ऑक्टोबरपासून आगरतळा इथं त्रिपुराविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. खराब फिटनेसमुळं पृथ्वी शॉची संघात निवड झाली नसल्याचं वृत्त आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या प्रशिक्षकांनी दोन आठवड्यांसाठी तयार केलेल्या फिटनेस प्रोग्रामचं पालन करण्यास सांगितलं आहे. टीम मॅनेजमेंटनं एमसीएला दिलेल्या अहवालात पृथ्वी शॉच्या शरीरात 35 टक्के फॅट असल्याचं सांगितलं आहे आणि संघात परत येण्यापूर्वी त्याला कठोर प्रशिक्षणाची गरज आहे.
रहाणेचं कर्णधारपद कायम : पृथ्वी शॉनं आतापर्यंत चालू रणजी ट्रॉफी हंगामातील दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये अनुक्रमे 7,12, 1 आणि 39 धावा केल्या आहेत. एमसीएच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'त्याला वगळण्यात आलं आहे आणि पृथ्वीला पुन्हा संघात निवड होण्यापूर्वी सराव करणे आणि वजन कमी करणं आवश्यक आहे.' दरम्यान, त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबई संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरही सामना खेळणार आहेत तर सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळं या सामन्यातून बाहेर आहे.