नवी दिल्ली Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. यानंतर आजपासून म्हणजेच 27 जुलैपासून सर्व देशांतील खेळाडू विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवताना दिसणार आहेत. आज भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी आणि टेनिससारख्या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत पदक मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
27 जुलै रोजी कोणत्या भारतीय खेळाडूंचे होणार सामने :
नेमबाजी : नेमबाजीमध्ये भारतासाठी आज एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. यात 10 मीटर एअर रायफल सांघिक पात्रता, 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता, 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता या स्पर्धा होणार आहेत. भारतासाठी 10 मीटर एअर रायफल संघात संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलावेनिल वालारिवन, रमिता जिंदाल हे दिसणार आहेत. तर सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा 10 मीटर एअर पिस्तूल पुरुषांच्या सामन्यात दिसणार आहेत. यासोबतच रिदम सांगवान, मनू भाकर यांचे 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता स्पर्धेत आपला खेळ असेल.
- 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता (संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलावेनिल वालारिवन, रमिता जिंदाल) - दुपारी 12:30 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता (सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा) - दुपारी 2 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता (रिदम सांगवान, मनू भाकर) - दुपारी 4 वाजता
बॅडमिंटन : बॅडमिंटनमध्ये आज भारताचे तीन सामने होणार असून यात पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना ग्वाटेमालाच्या कॉर्डन केविनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना फ्रान्सच्या कॉर्व्ही लुकास आणि लेबर रोनन यांच्याशी होईल. तर महिला दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी किम सो योंग आणि कांग ही योंग या कोरियन जोडीसोबत खेळताना दिसणार आहे. लक्ष्य सेन तसंच सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून भारताला गट टप्प्यातील सामन्यांमध्ये मोठ्या अपेक्षा असतील.
- पुरुष एकेरी गट स्टेज (लक्ष्य सेन) - दुपारी 12 वाजता
- पुरुष दुहेरी गट स्टेज (सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी) - दुपारी 12 वाजता
- महिला दुहेरी गट (तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा) - दुपारी 12 वाजता