छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - मुंबई, ठाणे जिल्ह्यानंतर शिवसेना विशेषतः हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला कोणता असेल तर तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आहे. या जिल्ह्याला नवीन ओळख बाळासाहेब ठाकरेंनीच दिली. सुरुवातीला अनेक वर्षं नामांतर करण्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत गाजला. मात्र ज्यावेळी शहराची ओळख बदलली, त्यानंतर ठाकरे नावाचं वलय घट्ट होण्याऐवजी ते अक्षरशः नामशेष झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्हाचा करिष्मा कायम असला तरी ठाकरे नावाचा दबदबा मात्र नामशेष झालाय. 25 वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.
शिवसेनेने निर्माण केलंय राजकीय वजन : छत्रपती संभाजीनगर म्हटलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आवडीचे आणि हक्काचे शहर मानले जाते. त्यांना या जिल्ह्यातील मतदारांनी असीम प्रेम दिले. त्यामुळे 25 वर्षं लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाच्या मदतीने सत्तेची फळ शिवसेना पक्षाने चाखली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनादेखील तसाच किंबहुना थोडा अधिकचा जनाधार मतदारांनी दिला. त्यामुळेच 2019 विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघांत 6 जागांवर शिवसेना आणि 3 जागांवर भाजपा विजयी झाला. मागील 25 वर्षांत सर्वाधिक जागा निवडून आल्याने सेनेची ताकद घट्ट झाली असं वाटत असताना राजकीय भूकंप झाला आणि पक्षाची वाताहत झाली.
ठाकरे नावाचे होते वलय : 1980 नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे नावाचे हिंदुत्ववादी वादळ मराठवाड्यात दाखल झालंय. निझामाच्या विचारांचे वलय असलेल्या या भागात हिंदुत्वाचा विचार अनेक लोकांना भावाला. बाळासाहेबांचा आक्रमकपणा, भाषण शैली त्यामुळे वेगळं वलय त्यांनी निर्माण केलंय. सत्तेपासून दूर असलेल्या सर्वसामान्याला राजकारणात त्यांनी स्थान दिल्याने प्रत्येकाने आपलाच पक्ष असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. फलित म्हणून महापालिका ताब्यात घेतली. मोरेश्वर सावे यांच्या रूपाने खासदार मिळाला. चंद्रकांत खैरे यांच्या सारखे नेते उदयास आले. त्यानंतर शिवसेनेने मागे वळून कधीच पाहिलेच नाही. महापालिकेत भाजपाच्या माध्यमातून 25 वर्षांपेक्षा जास्त काळ सलग सत्ता मिळवण्यात यश आले. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या भागात पक्षाचा दबदबा कायम राहिला तो 2019 विधानसभा निवडणूक होईपर्यंत.
त्या मैदानावर बाळासाहेबांचं शेवटचं आवाहन : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाची मोहिनी जिल्ह्यातील मतदारांना नेहमी पडत राहिलीय. त्यांची जाहीर सभा सांस्कृतिक क्रीडा मंडळ या मैदानावर होत असायच्या. प्रत्येक वेळी आपल्या जाहीर सभांचे विक्रम ते स्वतःच मोडीत काढायचे. त्यांना ऐकण्यासाठी अन् मैदानात जागा पकडण्यासाठी अनेक जण काही तास आधीच येऊन जागा आरक्षित करून ठेवायचे. याच मैदानात औरंगजेब याच्यासारख्या जुलमी राजाच्या नावाची गरज नाही, असं म्हणत आजपासून हा जिल्हा म्हणजे "संभाजीनगर" असे नामकरण त्यांनी केलंय. अनेक वर्ष आपले विचार त्यांनी मांडले. 2014 विधानसभा निवडणुकीच्या आधी बाळासाहेब आजारी असताना त्यांनी आपले विचार मांडणार व्हिडीओ दाखवले. त्यामध्ये त्यांनी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं भावनिक आवाहन केलं होतं. त्यांच्या निधनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला साथ देत बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. मात्र पक्षात फूट पडल्यावर 2024 मधील निवडणुकीत पक्षाच्या नावाला, चिन्हाला तेच प्रेम मिळाले, मात्र त्यांचे पुत्र असलेल्या उद्धव ठाकरे यांना मात्र मतदारांनी नाकारले.
एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचे पाच आमदार : ठाकरे नावाचं वलय छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात वाढत असताना त्यावेळचे पक्षातील बडे नेते एकनाथ शिंदेंनी बंड केलंय. त्यावेळी जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यामध्ये एकनिष्ठ आणि अनुभवी असलेले आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह काँग्रेसमधून पक्षात आलेले अब्दुल सत्तार आणि पहिल्यांदाच आमदार झालेले रमेश बोरनारे यांचा समावेश होता. त्यात एकमेव कन्नडचे उदयसिंग राजपूत हे आमदार ठाकरे यांच्यासोबत राहिले. जिल्ह्यात पाच गद्दार आणि एक निष्ठावंत, अशी टीका ठाकरे गटाने केली.
निवडणुकीत ठाकरे उद्ध्वस्त : लोकसभा निवडणुकीत ठाकरे नावाचा करिष्मा कायम राहील, असं वाटत असताना लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी धनुष्यबाण चिन्हावर विजय मिळवत शिवसेनेचा दबदबा कायम ठेवला. मात्र पक्षाची मुख्य ताकद असलेल्या ठाकरे नावाचे वलय असलेल्या गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विधानसभा निवडणुकीत वेगळी परिस्थिती असेल, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते बोलत असताना शिंदेंच्या पाच शिलेदारांनी त्यांचे गड राखलेच, मात्र ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली एकमेव जागादेखील आपल्या ताब्यात घेतली. तसेच ठाकरेंच्या नावाचं वलय असलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त करत आगामी निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर त्यांच्या पक्षातील फुटलेल्या गटाने आव्हान निर्माण केलं, असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय.
2019 विधानसभा निवडणुकीपर्यंत करिष्मा कायम : 1988 सालच्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना पक्षाने मराठवाड्यात पाय रोवयाला सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष करिष्मा पाहायला मिळाला. भाजपा या मित्र पक्षाच्या मदतीने 25 वर्षं महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. 2019 विधानसभा निवडणुकीपर्यंत हा करिष्मा कायम राहिला. मात्र युती धर्म झुगारून काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांसोबत गेल्याने मतदार नाराज झाले. हिंदुत्व हा प्रखर मुद्दा घेऊन जात असताना महाविकासआघाडीत आल्यावर मात्र अल्पसंख्याकांचे मत मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अपयशी राहिला. ठाकरे नावाची मतं आपल्यासोबत राहतीलच, त्यात मुस्लिम आणि इतर मतदार आपल्या सोबत आल्याने ताकद वाढेल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना होती. हिंदूंची मतं आपल्याकडे राहतील, असं त्यांना गृहीत धरणे त्यांना भारी पडलं. त्यामुळेच हक्काची मतं तर दूर गेलीच, मात्र नवीन मतदारदेखील म्हणावे तसे जवळ आले नाहीत. परिणामी ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा पराभव झाला आणि ताकद अगदी शून्यावर गेली, असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय. त्यात पक्षातील स्थानिक पातळीवर असणारे वाद हेदेखील कारणीभूत राहिले, असंदेखील त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत ठाकरे यांना आव्हान : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. मागील 25 वर्षांत पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात भोपळा फोडता आलेला नाही. त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधी पक्षासोबत स्वतःच्या पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या गटाचे आव्हान असणार आहे. ठाकरे गटाला इतर कोणताही नाही तर स्वतःचा पक्ष डोकेदुखी ठरलाय. असं म्हणतात, बाहेरच्या शत्रूशी दोन हात करणे सोपे असते, मात्र शत्रू स्वतःच्या घरात असला तर त्याच्याशी दोन हात करणे अवघड जाते, त्याचा प्रत्यय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना येतोय. यातून आता आपल्या नावाचे वलय असलेला पक्ष बाहेर काढण्यासाठी मोठी अग्निपरीक्षा उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील नेत्यांना द्यावी लागणार आहे.
हेही वाचा-