पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजांची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारताचे स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग सोमवारी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकासाठी पात्र ठरले आहेत.
कोरियन नेमबाजांना टाकलं मागे : मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी चमकदार कामगिरी करत 3 सिरीजमध्ये 580 गुण मिळवले आणि पात्रता फेरीत तिसरं स्थान पटकावलं. भारतीय संघानं चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या कोरिया रिपब्लिकच्या ओ ये जिन आणि ली वोंहो यांना मागे टाकलं.
मंगळवारी होणार कांस्यपदकाची लढत : भारतीय नेमबाजांना कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोंहो यांच्याशी सामना करावा लागणार आहे. मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता दोन्ही संघ कांस्यपदकाच्या लढतीत आमनेसामने येतील. रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी मनू भाकर या सामन्यात दुसरं कांस्यपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
मनूला इतिहास रचण्याची संधी : आता जर मनू भाकरनं 30 जुलै रोजी कांस्यपदक जिंकलं तर ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरेल. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार आणि पीव्ही सिंधू यांनी निश्चितपणे प्रत्येकी दोन पदके जिंकली आहेत, परंतु ती पदकं वेगळ्या ऑलिम्पिक हंगामांमध्ये आली आहेत.
तुर्की आणि सर्बिया यांच्यात सुवर्णपदकाची लढत : दरम्यान, तुर्कीच्या सेवल इलायदा तरहान आणि युसूफ डिकेक यांनी टोकियो 2020 मध्ये भारतानं सेट केलेल्या 582 गुणांच्या ऑलिम्पिक पात्रता विक्रमाची बरोबरी केली. सुवर्णपदकाच्या लढतीत तुर्की संघाचा सामना सर्बियाच्या झोराना अरुनोविक आणि दामिर मिकेक यांच्याशी होणार आहे. या दोन्ही जोड्यांनी पॅरिस 2024 मध्ये पदक निश्चित केलं आहे.
रमितानं केली निराशा : भारताची स्टार नेमबाज रमिता जिंदाल सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली. नेमबाज रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहात अंतिम फेरी गाठली होती. यानंतर तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र ती अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली.
हेही वाचा :
- रमिताचा 'नेम' चुकला, भारताला पदकाची हुलकावणी; 20 वर्षीय नेमबाज अंतिम फेरीत पराभूत - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला धक्का; बॅडमिंटन एकेरीत लक्ष्य सेनचा विजय अवैध, तर दुहेरीत सात्विक-चिराग यांचा आजचा सामना रद्द, कारण काय? - Paris Olympics 2024