महाराष्ट्र

maharashtra

रमिताचा 'नेम' चुकला, भारताला पदकाची हुलकावणी; 20 वर्षीय नेमबाज अंतिम फेरीत पराभूत - Paris Olympics 2024

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 29, 2024, 1:37 PM IST

Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज रमिता जिंदाल 10 मीटर एअर रायफल महिलांच्या वयक्तिक स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिली.

Paris Olympics 2024 Shooting
नेमबाज रमिता जिंदाल (AP Photo)

पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : भारताची स्टार नेमबाज रमिता जिंदाल सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली. नेमबाज रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहात अंतिम फेरी गाठली होती. यानंतर तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र ती अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली. रविवारी मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं.

दुसऱ्या सीरिजमध्ये खराब कामगिरी : रमितानं या स्पर्धेत खराब कामगिरी केली. पहिल्या सिरीजनंतर रमिता 10.3, 10.2, 10.6, 10.9, 10.5 गुणांसह चौथ्या स्थानावर होती. मात्र दुसऱ्या सिरीजच्या शेवटच्या शॉटमध्ये रमिताची कामगिरी निराशाजनक होती. ज्यामुळं तिला फक्त 9.7 गुण मिळाले. या खराब शॉटमुळं तिच्या स्पर्धेतील स्थानावर लक्षणीय परिणाम झाला आणि ती स्पर्धेतून बाहेर पडली. या शॉटपूर्वी रमिता तिसऱ्या स्थानावर होती, पण तिच्या कमी गुणांमुळं ती सातव्या स्थानावर राहिली.

कोण आहे रमिता जिंदाल : हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे कर सल्लागार आहेत. 2016 मध्ये रमिताला तिच्या वडिलांच्या जागी करण शूटिंग रेंजमध्ये नेण्यात आलं. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. 20 वर्षीय रमितानं 2022 मध्ये ज्युनियर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर रमितानं हॉंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदकं जिंकली होती.

कशी होते अंतिम फेरी : दरम्यान, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ खेळाडू होते. अंतिम फेरीच्या सुरुवातीला 5 शॉट्सच्या दोन सीरिज असतात (प्रत्येक शूटरसाठी 5+5 शॉट्स (एकूण 10 शॉट्स). यात 250 सेकंदात एक शॉट्स पूर्ण करणं गरजेचं असतं. यातील प्रत्येक 2 शॉट्सनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळेपर्यंत सर्वात कमी गुण मिळवणारा नेमबाज स्पर्धेबाहेर होत गेला. सातव्या स्पॉट एलिमिनेशनसाठी रमिता आणि फ्रेंच नेमबाज यांच्यात लढत झाली. मात्र रमिताचा नेम चुकल्यानं तिला सातव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. पहिल्या तीन स्थानावर राहिलेले खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी पात्र ठरतात.

हेही वाचा :

  1. रमिता जिंदालचा अचूक 'निशाणा'; 10 मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश, नेमबाजीत देशाला मिळणार दुसरं पदक? - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details